डोंबिवली :
गर्दीच्या वेळेत लोकल मधून प्रवास करताना तोल जाऊन एका २६ वर्षीय तरुणीचा सोमवारी जागीच मृत्यू झाला. सकाळी आठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मागच्या मंगळवारी अवधेश दुबे (२५) या डोंबिवलीकर तरुणाचाही गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. आठवडाभरात लोकलमधून पडून दोन तरुण डोंबिवलीकरांचा मृत्यू झाल्याने रेल्वेतील वाढती गर्दी हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रिया श्यामजी राजगोरे (२६) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेला राहणारी रिया ठाण्याला कामाला होती. नेहमीप्रमाणे ती सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलध्ये चढली. मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाला दरवाजात उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली. गर्दीच्या रेट्यामुळे कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन ती लोकलमधून खाली पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान २३ एप्रिल रोजी डोंबिवलीतील अवधेश दुबे याचाही लोकलमधून प्रवास करताना गर्दीमुळे डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून खाली मृत्यू झाला. आठवडाभरात लोकलमधून पडून दोघांचा जीव गेल्याने डोंबिवलीकर संताप व्यक्त करीत आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर ठाण्यापुढील शहरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत असल्याने त्याचा ताण रेल्वेवर पडत आहे. प्रवासी संख्या वाढत असली तरी ठाण्यापलीकडील नागरिकांसाठी स्वस्त वाहतुकीची अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था गेल्या १० -१५ वर्षात करण्यात आलेली नाही. पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन टाकण्यात आली असली तरी जादा लोकल वाढल्या नाहीत. त्यामुळे वाढती गर्दी ही मोठी समस्याच झाली आहे. ठाण्यापलीकडील नागरिकांना रोज सकाळ – संध्याकाळी धक्काबुक्की करत व लटकत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल गर्दीच्या वेळेत जीवघेणी ठरत आहे.