मुंबई :
पावसाळा सुरू होण्यासाठी एक महिना शिल्लक असल्याने मुंबई महानगरपालिकेने डास उत्पत्ती रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. पावसाळ्यामध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ६७ ठिकाणांची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यामध्ये वाढणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने महिनाभर अगोदरपासूनच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानके, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेट्रो, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी ६७ सरकारी आणि निमसरकारी संस्थांच्या इमारतींची पाहणी यादी तयार करण्यात आली आहे. या इमारतींची पाहणी करण्याचे काम पालिकेच्या सर्व २४ विभागातील कीटक नियंत्रण अधिकारी आणि खासगी यंत्रणांमार्फत करण्यात येत आहे. या तपासणीत आढळून आलेल्या उणिवा संबंधित यंत्रणांना कळवून त्या पूर्ण करण्यास सांगण्यात येत आहे. यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंध करणे, आवारात पडलेले भंगार काढणे आदी कामे करण्यास त्यांना सांगण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
१६ मे पासून काम पूर्ण झाले की नाही, हे तपासण्यास सुरुवात होईल. प्रत्येक प्रभागातील पेस्ट कंट्रोल अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावर संबंधित ठिकाणी डास प्रतिबंधक काम किंवा भंगार काढण्याचे काम केल्यासंदर्भातील माहिती देण्यात येणार आहे. काम पूर्ण न झाल्यास आणखी ७ दिवसांची मुदत दिली जाईल. तसेच निष्काळजीपणा केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.