मुंबई :
राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) ४१ औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एनपीपीएच्या नुकत्याच झालेल्या १४३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये हृदयविकार, मधुमेह यासारख्या आजारांच्या औषधांचा समावेश असल्याने या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
एनपीपीएच्या नुकत्याच झालेल्या १४३ व्या बैठकीमध्ये ४१ औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये मधुमेह, हृदय, यकृत, अँटासिड, संसर्ग, ॲलर्जी, मल्टीविटामिन, अँटीबायोटिक्सच्या या औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डॅपग्लिफ्लोझिन मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड औषधांच्या एका गोळीसाठी पूर्वी ३० रुपये मोजावे लागत होते. मात्र नव्या किमतीनुसार ही गोळी १६ रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे दम्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारण्यासाठी दिल्या जाणाऱ्या बुडेसोनाइड आणि फॉर्मोटेरॉल या एकत्रित वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या एका मात्रेसाठी किंमत ६.६२ रुपयांने कमी करण्यात आली आहे. या औषधाची १२० मात्रा असलेली बाटली ३ हजार ८०० रुपयांना मिळते.
रक्तदाब कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रोक्लोरोथियाझाइडच्या गोळ्यांची किंमत ११.०७ रुपयांवरून १०.४५ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. सेफ्टाझिडीम आणि ॲव्हीबॅक्टम पावडरच्या एका कुपीची किंमत ४००० हजार रुपये आहे. नव्या किमंतीनुसार आता ही कुपी १ हजार ५६९ रुपयांना मिळणार आहे. अँटासिड अँटीगॅस जेलची किरकोळ किंमत प्रती मिली २.५७ वरून ०.५६ रुपयांपर्यंत कमी केली आहे. एटोरवास्टॅटिन, क्लोपीडोग्रेल आणि ऍस्पिरिन कॅप्सूलच्या किमती सध्या ३० रुपये असून, त्याची किंमत आता १३.८४ रुपये इतकी झाली आहे. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा एनपीपीएने मधुमेह व उच्च रक्तदाबासाठीच्या ६९ औषधांच्या किमती कमी केल्या होत्या.
मधुमेही रूग्णांना मिळणार दिलासा
भारतात १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असलेल्या देशांमध्येही भारत आघाडीच्या स्थानावर आहे. यावेळी देशातील अनेक रूग्ण यासंदर्भातील औषधं आणि इन्सुलिनवर अवलंबून आहेत. अशावेळी या रूग्णांसाठी औषधांमध्ये झालेली घट दिलासा देणारी असणार आहे.