मुंबई :
देशामध्ये रक्तदानामध्ये महाराष्ट्र मागील अनेक वर्षांपासून प्रथम क्रमांकावर आहे. परंतु यामध्ये स्वेच्छिक रक्तदानाचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये २०२३ मध्ये संकलित रक्तापैकी ९९.५८ टक्के रक्त हे स्वैच्छिक रक्तदानातून मिळाले आहे. स्वैच्छिक रक्तदात्यांमध्ये तरुण वर्ग सर्वाधिक असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून मिळाली.
दरवर्षी १४ जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जाताे. यंदा जागतिक रक्तदाता दिन हे ‘दानाची 20 वर्षे : रक्तदात्यांचे आभार!’ हे घोषवाक्य आहे. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदात्यांचे आभार मानण्यात येत असून, महाराष्ट्रामध्ये स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. राज्यामध्ये स्वैच्छिक रक्तदानाची टक्केवारी ९९.५८ टक्के एवढी आहे. २०२३ मधील एकूण ३३ हजार ८०७ स्वैच्छिक रक्तदान शिबीराच्या माध्यमातून २० लाख ४४ हजार युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २२ जिल्ह्यांमध्ये १०० टक्के रक्त हे स्वैच्छिक रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संकलित करण्यात आले आहे. राज्यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक ४ हजार १५४ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याखालोखाल मुंबईमध्ये ३ हजार ३९६ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना पत्र
आपत्कालीन परिस्थितीत रक्तदाते उपलब्ध व्हावेत यासाठी देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्तदाता नोंदणी म्हणजेच रक्तदात्यांची बँक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे लोकांना त्यांचे रक्तगट माहिती होण्याबरोबरच रुग्णालयांनाही वेगवेगळ्या गटातील लोकांची माहिती मिळणार आहे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत या लोकांशी संपर्क साधून रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल.
जागतिक रक्तदानाच्या दिवशी रक्तदान करणारे स्वैच्छिक रक्तदात्यांमध्ये तरुण वर्गाबरोबरच, रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या धार्मिक, सामाजिक, राजकीय संस्था, विविध कंपन्या, कॉर्पोरेट हाऊसेस यांचे आभार. भविष्यात त्यांनी नियमित रक्तदान करून या सामाजिक कार्याची परंपरा अखंड सुरु ठेवावी व इतरांनाही प्रोत्साहित करावे.
– महेंद्र केंद्रे, संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद