शिक्षण

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या आता थेट दुसऱ्या वर्षात मिळणार प्रवेश

२६ जूनपासून सुरू होणार प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई :

कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन मधून ३ वर्षाचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी म्हणजे बी.एस्सी ॲग्री अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. या प्रवेश प्रक्रियेला २६ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरूवात होत आहे. ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत ३ वर्षाच्या इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो. या प्रवेशसाठी खुल्या प्रवर्गासाठी किमान ६.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुण (सीजीपीए) सह उत्तीर्ण व आरक्षित प्रवर्गासाठी किमान ५.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह (सीजीपीए) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठांतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामधील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याची प्रक्रिया २६ जून, २०२४ पासून सुरु होत आहे, अशी माहिती सीईटी सेलचे कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली.

ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी सविस्तर तपशिलाचा अंतर्भाव असलेली प्रवेश माहिती पुस्तिका agripug2024.mahacet.org या संकेतस्थळांवर २६ जून, २०२४ पासून उपलब्ध करण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी ५ जुलै २०२४ ही अंतिम तारीख असल्याचेही निकम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *