मुंबई :
गोकुळदास तेजपाल रुग्णालय (जी.टी. रुग्णालय) आणि कामा रुग्णालयाचे एकत्रित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून ५० विद्यार्थी क्षमता असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे दक्षिण मुंबईसह, ठाणे, कल्याण, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना अधिक अद्ययावत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
गोकुळदास तेजपाल रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतर करण्यास २०१२ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली. तसेच वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांशी सतत पाठपुरावा केला. गोकुळदास तेजपाल रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्याची पडताळणी करून नुकतेच १५ दिवसांपूर्वी आयोगाने रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच ऑनलाईन माध्यमातून मुलाखत घेतली. त्यानंतर काही तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना करत या शैक्षणिक वर्षांपासून ५० विद्यार्थी क्षमता असलेले जी.टी. रुग्णालय व कामा रुग्णालयाचे एकत्रित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली. पुढील शैक्षणिक वर्षांत ही संख्या दुप्पट म्हणजे १०० होईल, अशी माहिती गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र संकपाल यांनी दिली.