मुंबई :
विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात स्थापित असलेल्या पश्चिम विभागीय उपकरण केंद्रात (वेस्टर्न रीजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर (WRIC) आता विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) घेता येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना या केंद्रात अनुभवाधारीत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिकतानाच विद्यार्थ्यांना विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान, कौशल्ये आणि उद्योन्मुख क्षेत्रातील गरजा व संधी नुसार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम विभागीय केंद्र आणि मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या राष्ट्रीय सुविधा केंद्राला शिक्षक आणि प्रयोगशाळेसंबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा मोठा अनुभव असून आता या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.
१२० तासाच्या या कार्यांतर्गत प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना ऑप्टिकल मायक्रोस्कोप, अणू शोषण स्पेक्ट्रो फोटोमीटर, UV-VIS स्पेक्ट्रो फोटोमीटर, इन्फ्रारेड स्पेक्ट्रो फोटोमीटर, क्रोमॅटोग्राफी उपकरणे, संगणक देखभाल, इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन, ग्लास ब्लॉविंग अशा अनुषंगिक उपकरणांचे प्रशिक्षण, देखभाल व दुरुस्तीचे अनुभवाधारीत शिक्षण मिळणार आहे. विज्ञान शाखेतील एमएस्सी सत्र-२ आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी या कार्यांतर्गत प्रशिक्षणासाठी प्रविष्ठ होऊ शकतील.
विविध उपकरणे हाताळण्याचे व अनुभवाधारीत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देश्याने तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धीस हातभार लागणार असून रोजगारक्षमता आणि नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकणार असल्याचे या केंद्राचे संचालक प्रा. शिवराम गर्जे यांनी सांगितले. या प्रशिक्षणाला पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांमधील मनोबल वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यांतर्गत प्रशिक्षणामुळे विद्यार्थी आनंदी
विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रथम वर्षाचे विद्यार्थी पश्चिम विभागीय उपकरण केंद्राबरोबरच ठाणे येथील ‘इंडीयन रबर मॅन्युफॅक्चर्स असोशिएशन’ या नामांकित संस्थेमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग अंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. दोन्ही ठिकाणी मिळत असलेल्या प्रत्यक्ष व अनुभवधारीत प्रशिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत असून अशा प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्याचप्रमाणे उद्योगांशी निगडित अनुभव मिळाल्याने खऱ्या अर्थाने रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतील असेही विद्यार्थी त्यांच्या प्रतिक्रिया देताना सांगत आहेत. त्याचबरोबर पुस्तकांमध्ये शिकलेल्या विविध शास्रीय संकल्पनांचा कारखान्यांमध्ये होत असलेल्या प्रत्यक्ष उपयोग अनुभवता येत असल्याने मूलभूत संकल्पना आणखी समजण्यास मदत होत असल्याचेही विद्यार्थी सांगत आहेत. याचप्रमाणे रसायन तंत्रज्ञान संस्था येथेही कार्यांतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यांतर्गत अनुभवाबद्दल आनंद व्यक्त केला.