आरोग्य

कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढली पाच किलोची गाठ

कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत दिले जीवदान

 

मुंबई :

पोटदुखी, जुलाब त्याचबरोबर रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव या समस्येने त्रस्त असलेली महिला १० दिवसांपूर्वी कामा रुग्णालयात उपचारासाठी आली. विविध तपासण्यानंतर तिच्या पोटात गाठ असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करत तिच्या पोटातून पावणे पाच किलोची गाठ काढत या महिलेला जीवदान दिले आहे. गाठ कर्करोगाची आहे का हे तपासण्यासाठी ती प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे.

कुलाबा येथे राहणारी ५४ वर्षीय महिला आठवडाभरापासून पोटात दुखणे, वारंवार जुलाब होणे याबरोबरच रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होत असल्याने १ जुलै रोजी कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आली. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिला रुग्णालयात दाखल करून घेतले. तपासणीदरम्यान या महिलेला एक मूल असून एक गर्भपात झाला आहे, तर एका बाळाचे जन्मानंतर निधन झाल्याचे तिने सांगितले. पोटात वारंवार दुखत असल्याने डॉक्टरांनी या महिलेची ५ जुलै रोजी सोनोग्राफी तपासणी केली. त्यामध्ये तिच्या पोटात अंडाशयात मांस असल्याचे निदर्शनास आले‌. त्यामुळे त्याची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांनी ६ जुलै रोजी जे. जे. रुग्णालयामध्ये तिची एमआरआय चाचणी केली. यामध्ये तिच्या पोटात अंडाशयाच्या डाव्या बाजूला १४ × २२ × २२ सेमी इतक्या आकाराची गाठ असून, गर्भाशयाचा आकारही मोठा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुले या महिलेच्या काही रक्त तपासण्या केल्या असता त्या सदोष आल्या. रक्त तपासण्यांमध्ये महिलेला नव्याने उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याचेही निदान झाले. सर्व तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर ९ जुलै रोजी कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. शिरिष शेठ आणि डॉ. विजया बाब्रे यांनी या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून पावणे पाच किलो वजनाची गाठ बाहेर काढली.

या महिलेला जी.टी. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. या महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. तसेच ही गाठ कर्करोगाची आहे का हे तपासण्यासाठी ती प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *