शहर

एक तरी वारी आचरावी…

पंढरपूर :

चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी अफाट जनसागर (वारकरी, गरीब-श्रीमंत, आंधळे-पांगळे, सर्व जाती-धर्माचे) आषाढी एकादशी दिवशी टाळ-मृदुंगाच्या गजरात विठूचा गजर करत भक्तीरसात लीन होतो.

महाराष्ट्रात मध्ययुगामध्ये अनेक भक्तिसंप्रदाय उदयास आले आणि कमी-अधिक काळ आपला प्रभाव गाजवून क्षीण झाले किंवा नामशेष झाले, मात्र महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय याला अपवाद ठरला आहे. या संप्रदायाचा प्रभाव सतत वाढतच राहिलेला आहे. अगदी १९व्या, २०व्या आणि २१व्या विज्ञाननिष्ठ शतकामध्येही हा संप्रदाय टिकून आहे. एवढेच नव्हे तर तो समाजशास्त्र आणि साहित्य संशोधक यांच्या कुतूहलाचा विषय होऊन राहिला आहे. पंढरपूरची वारी हा प्रकार महाराष्ट्रातील वारकरी भक्तिसंप्रदायाला इतर भक्तिसंप्रदायांपासून खास रितीने वेगळा ठरविणारा आहे. काही तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्धीला आलेल्या किंवा पुराणकाळापासून माहात्म्य लाभलेल्या काशी, जगन्नाथपुरी, बद्रिकेश्वर, बालाजी तिरुपती, रामतीर्थ इत्यादी तीर्थक्षेत्रांसारखे पंढरपूर हे क्षेत्र नाही. पंढरपूरची वारी हा तीर्थक्षेत्रापेक्षा वेगळा प्रकार आहे. पंढरपूरची वारी करणे म्हणजे, तीर्थयात्रेचे पुण्य गाठीस बांधणे अशी काही भावना कोणताही वारकरी बाळगून नसतो. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतर तीर्थक्षेत्रांना यात्रा म्हणून जाऊन येण्याचा जो रिवाज (पद्धत) असतो त्याचा भक्तांचा दैनंदिन जीवनाशी अतूट संबंध असतोच असे नाही. उलटपक्षी तो तसा नसतो असे म्हणता येईल, परंतु पंढरपूरची वारी करणाऱ्या माणसांचे जीवन अगदी बदलून जावे अशी अपेक्षा असते. मुख्य म्हणजे आपण वारकरी असून वारकऱ्याचे व्रतस्थ जीवन जगत आहोत याची निदर्शने करणाऱ्या तुळशीमाळा, त्रिपुंडा किंवा खांद्यावर ‘भगवी’ पताका व तो टाळ-मृदुंगाचा आवाज यासारख्या खाणाखुणा त्याने निश्वयाने बाळगाव्यात अशीही अपेक्षा असते एवढेच नव्हे तर त्याने भगवद भक्ती करावी, कोणत्या यंत्राचे आणि ग्रंथाचे पंठण करावे यासंबंधानेही काही आदेश असतात. खरा वारकरी या आदेशांचे जास्तीत जास्त पालन करण्यात धन्यता मानतो. अन्य पंथांमध्ये दाखल होणाऱ्या भक्तांवर अशाच प्रकारच्या आदेशांचे निर्बंध असले, तरी त्या निर्बंधांना कर्मकांडाचे स्वरूप आलेले असते. वारकरी पंथामध्ये कर्मकांडाचा मुळागत निर्बंध केलेला आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अन्य भक्तिसंप्रदायांपेक्षा असलेले वेगळेपण अनेक प्रकारे सांगता येईल. येथे फक्त एका महत्त्वाच्या गोष्टीचा निर्देश करायचा आहे, तो म्हणजे वारकऱ्यांचे कुलदैवत कुठलेही असो, वारकरी होताच पंढरपूरच्या विठ्ठलाचा भक्त होऊन जातो, यातही पुन्हा वैशिष्ट्य असे की, पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती स्वीकारल्यावर अन्य देवतांच्या भक्तीचा त्याने त्याग करावयास पाहिजे असे बंधन त्याच्यावर नसते. त्यातूनच मग तो ईश्वराकडे (परमेश्वर) एकत्वबुद्धीने पाहण्यास शिकतो, म्हणूनच महासमन्वय ही संस्कृती घेऊन उभा राहिलेला वारकरी पंथ महाराष्ट्रात नुसताच लोकप्रिय झाला नाही, तर शतकानुशतके खंबीरपणे पाय रोवून स्थिरावला आहे.

ज्ञानदेव, नामदेवाच्या काळी महाराष्ट्रावर असलेल्या अस्मानी-सुलतानी आपत्तीमध्ये जनतेचा धीर खचू न देता त्यांची मने समर्थ बनविण्याचे काम या थोर संतांच्या भागवत धर्माने केले, ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बळ, वीर्य, तेज या सहा गुणांनी संपन्न असणाऱ्या भगवंताचा धर्म शक्तिगर्भ आहे. यातून स्वराज्य प्राप्त होते. रक्तहिन सामाजिक क्रांतीची विचारधारा निर्माण करण्याची ताकद या विचारसूत्रीत असली, तरी या गोष्टीस दुबळेपणा-भेकडपणाचे स्वरूप नसावे, म्हणून संत तुकाराम म्हणतात, ‘तरी भले देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणु काठी ।। वारकरी संघाच्या विचारांत जातिभेद, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा यांचा विचार होताना विठ्ठल उपासना आणि पंढरपूर वारीचे पडसाद उमटतात. ईश्वरप्राप्तीसाठी संसार न सोडता संसारात राहूनदेखील पारमार्थिक आनंद मिळवता येतो हे वारीतून दिसून येते. जीवनाचे ध्येय भक्ती हेच मानले आहे. मनामनांतील मशागत करणारा वारकरी संप्रदाय जीवन अंतर्बाह्य बदलून टाकतो, शुद्धाचरण सात्त्विक आहाराबरोबर चांगल्या विचारातून परस्पर द्वेष, मद, क्रोध, त्वेष यांसारख्या गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जणू वारी-वारकरी आचारात मिळते. यालाच आध्यात्मिक अभ्यास म्हटला जातो.

वारीला सुरुवात केली की, वर्षानुवर्षे पायी वारी करून वारकरी विठ्ठलमय होतात. वारीची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील जख्खोवाडी गावच्‍या ह.भ.प कै. जनाबाई शिवाप्पा संकपाळ यांनी आयुष्यात ३५ पायी वाऱ्या केल्या. रोज सकाळी पहाटे तीनला उठून आंघोळ करून गल्लीतील सर्व तुळशी कटे.. गावातील सर्व मंदिर पूजन केल्याशिवाय तोंडात पाणी घेत नव्हत्या. त्यांची शेवटची इच्छा मी मरण पावल्यानंतर माझ्या अस्थी चंद्रभागेमध्ये सोडाव्या अशी होती, अशा या माऊलीचे १०२ व्या वर्षी निधन झाले. त्यांची अस्थी त्यांचे मोठे नातू देवदास मारुती संकपाळ यांनी चंद्रभागेत विसर्जन करून त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यानंतर त्यांच्या मोठ्या सूनबाई इंदुबाई मारुती संकपाळ तसेच त्‍यांचे पणतू शिवाजी विठ्ठल चौगुले व त्‍यांच्‍या पत्‍नी प्रियांका यांनी तुळशीमाळ घालून वारीची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे.

पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत।।
व्रत एकादशी करीन उपवासी।
गाईन अहर्निशी मुखी नाम।।
नाम विठोबाचे घेईन मी वाचे।
बीज कण्यांतीचे तुका म्हणे ||
वारकऱ्यांचा पोषाख पांढरा शुभ्र कुडता, धोतर व डोक्यावर टोपी, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, हातामध्ये भगवा पताका व कपाळावर गंध, भजन-कीर्तनामध्ये ते धुंद असतात. धुंद असतेवेळी बघताना असे वाटते की, आपणही त्यांच्यामध्ये मग्न व्हावे, म्हणून एकदा तरी जाऊन यावे पंढरपुरा…!

लेखक : शिवाजी विठ्ठल चौगुले, मु.पो.बेलेवाडी मासा, कागल कोल्हापूर, मो. क्र. ९८६७७३२५०४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *