मुंबई :
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विक्रोळी कन्नमवार नगर येथील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराला ८ जुलै २०२४ रोजी मुंबई महापालिकेने वर्कऑर्डर दिली आहे. येत्या काही दिवसांत या १३ मजली ५०० खाटांचे सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ होईल.
महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचे भूमिपूजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यासाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. महात्मा फुले रुग्णालयाच्या १३ मजली इमारतीसह या ठिकाणी डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी २१ मजली वसतिगृह सुद्धा उभारण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मागील अनेक वर्षांपासून हे रुग्णालय बंद ठेवण्यात आले होते. या रुग्णालयामुळे कन्नमवार नगर, पँथर नगर, टागोर नगर, कांजूरमार्ग, सूर्यनगर, विक्रोळी पार्ट साईट, भांडूप या परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. महात्मा फुले रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अद्ययावत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे घाटकोपर येथील राजावाडी किंवा शीव रुग्णालयावर येणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
लढ्याला यश आले
महात्मा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद परब यांनी आमरण उपोषण केले हाेते. त्यामुळे म्हाडाने आपली आडमुठे धोरण बदलत मुंबई महापालिकेकडून भूखंडाच्या विविध शुल्कापोटी १३ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये घेऊन ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. त्यामुळे या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला.