आरोग्य

गॅस्ट्रो, कावीळ, लेप्टो, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबई : 

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. जुलैच्या १५ दिवसांमध्ये साथीच्या आजारांचे १३२२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये गॅस्ट्रो, कावीळ, स्वाईन फ्लू आणि लेप्टो या आजारांचे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये अवघ्या १५ दिवसांमध्ये १ हजार ३२२ रुग्ण सापडले आहेत. जुनमध्ये महिनाभरात सापडलेल्या १ हजार ३९५ रुग्णांच्या तुलनेत जुलैमध्ये अधिक रुग्ण सापडले आहेत. जूनमध्ये डेंग्यूचे ९३ रुग्ण सापडले होते, तर जुलैच्या १५ दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १६५ वर पोहचली आहे. जूनच्या तुलनेत स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे. जूनमध्ये स्वाईन फ्लूचे १० रुग्ण होते, तर जुलैमध्ये ५३ रुग्ण सापडले आहेत. लेप्टोच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गत महिन्यामध्ये लेप्टोचे २८ रुग्ण होते, तर जुलैमध्ये १५ दिवसांमध्ये लेप्टोचे ५२ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे जूनमध्ये कावीळचे ९९ रुग्ण होते. १५ जुलैपर्यंत ७५ रुग्ण सापडले आहेत. गत महिन्यात गॅस्ट्रोचे ७२२ रुग्ण होते. तर १५ जुलैपर्यंत मुंबईमध्ये गॅस्ट्रोचे ६९४ रुग्ण सापडले. यावरून जूनच्या तुलनेत जुलैमध्ये गॅस्ट्रो, स्वाईन फ्लू, कावीळ आणि लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहेत. दरम्यान, जूनमध्ये हिवतापाचे ४४३ रुग्ण सापडले होते. तर जुलैमध्ये हिवतापाचे २८२ रुग्ण सापडल्याने हिवतापाला प्रतिबंध करण्यामध्ये काहीअंशी यश येत असल्याचे दिसून येत आहे.

१५ दिवसांत १३ हजार उंदीर मारले

पावसाळ्यामध्ये लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास उंदीर कारणीभूत असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून उंदरांना मारण्यात येते. १ ते १५ जुलैपर्यंत कीटकनाशक विभागाकडून १३ हजार २५५ उंदीर मारण्यात आले आहेत, तर जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल २ लाख ३९ हजार ५२७ उंदीर महानगरपालिकेकडून मारण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *