मुंबई :
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी सप्ताहानिमित्त जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आठवडाभरामध्ये विविध प्रकारच्या ३२ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया या सर्वसाधारण प्लास्टिक सर्जरी प्रकारातील आहेत.
जे.जे. रुग्णालय व त्याच्याशी संलग्न असलेले जी.टी. रुग्णालय व सेंट जॉर्जेस रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉक्टरांनी एकत्रित येत ८ ते १५ जुलैदरम्यान या महत्त्वाच्या शस्त्रक्रियांवर भर देत तब्बल ३२ शस्त्रक्रिया केल्या. यामध्ये अपघातात जखमी झालेले रुग्ण यांच्यावरील शस्त्रक्रियेचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल हात आणि रक्तवाहिन्यांची जोडण्याच्या आठ शस्त्रक्रिया, सौंदर्यवर्धक पाच शस्त्रक्रिया, भाजल्याने त्वचारोपण करण्याच्या चार, मूत्रसंस्था व जननसंस्था यामधील इंद्रियासंदर्भातील दोन आणि क्रॅनिओफेशियलची एक शस्त्रक्रिया अशा एकूण ३२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या सप्ताहामध्ये करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांमुळे जे.जे. रुग्णालय व त्याच्याशी संलग्न असलेल्या जी.टी व सेंट जॉर्जेस रुग्णालयात खासगी रुग्णालयांप्रमाणे शस्त्रक्रिया होतात हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न यातून केला आहे. जे.जे. रुग्णालयात स्थूलपणा कमी करत शरीराला आकार देणारी शस्त्रक्रिया, लायपोसक्शन, चरबी कमी करणारी शस्त्रक्रिया, हनुवटी, गाल तसेच ओठांची शस्त्रक्रिया, नाक- डोळ्याच्या पापणीची शस्त्रक्रिया, स्तनाचा आकार बदलणे, स्तन प्रत्यारोपण, सौंदर्यवर्धक अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया जे.जे. रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागामध्ये केल्या जातात, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत घरवाडे यांनी दिली.
सप्ताहामध्ये ३९ वर्षीय तृतीयपंथीय असलेल्या श्रीदेवी (नाव बदललेले) हिने खासगी रुग्णालयामध्ये प्राथमिक शल्यचिकित्सेसाठी आपल्याकडील पैसे खर्च करूनही काहीही उपयोग झाला नाही. मात्र जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या आयुष्य अधिक सुकर केल्याचे तिने सांगितले. त्याचप्रमाणे एका डबेवाल्याच्या मुलीच्या नाकावर शस्त्रक्रिया करून तिचे रूप आकर्षक केले. तिची ही शस्त्रक्रिया माफक दरात झाल्याने तिने जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा आभार मानले.
खासगी रुग्णालयामध्ये खर्चिक असलेल्या सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया या जे.जे. रुग्णालयात माफत दरात होतात. यासाठी प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी विशेष मेहनत घेतात.
– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय