मुंबई :
एसटी कर्मचाऱ्यांना संप काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी व एसटीच्या खर्चाला लागणारी रक्कम चार वर्षे देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण ही रक्कम कधीही दिली नाही. सध्या फक्त सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत असून, ती पण तोडून तोडून देण्यात येत आहे. त्यामुळे गेले अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रक्कमांचा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल हिस्सा ट्रस्टकडे भरण्यात आलेला नाही. साहजिकच ट्रस्टला मिळणारे त्या रक्कमेवरील व्याज बुडत असून या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरची देणी मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे सरकारने सवलत मूल्य रक्कम ही दर महिन्याला एसटीकडून प्रस्ताव गेल्यानंतर न देता एसटी महामंडळाला आगाऊ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे.
भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रक्कमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो. पण कर्मचाऱ्यांकडून कपात करण्यात आलेल्या रक्कमेचा हिस्सा गेले अनेक महिने ट्रस्टकडे भरणा केला नसून ही रक्कम अंदाजे १५०० कोटी रुपये इतकी झाली आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे कोट्यवधी रुपयांचे व्याज ट्रस्टला मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रस्ट सुद्धा अडचणीत सापडल्या असून या गोत्यात आल्या आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ही रक्कम ट्रस्टकडे वेळेत भरणा करण्यात आली नाही तर भविष्यात या रक्कमेतून दिली जाणारी एसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरची देणी देण्यात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकार सध्या देत असलेली सवलत मूल्य रक्कम ही तोडून तोडून न देता ती रक्कम आगाऊ दिल्यास हा मुद्दा मार्गी निघेल असेही त्यांनी म्हटले.
त्यामुळे वर्षभराची होणारी एकूण साधारण ४४०० कोटी रुपये इतकी सवलत मूल्य रक्कम सरकारकडून आगाऊ दिल्यास हा मुद्दा निकाली निघेल. तरी वर्षभराची सवलत मूल्य रक्कम सरकारने एसटीला आगाऊ द्यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.