पंढरपूर :
आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून मुख्य १२ पालख्यांसह हजाराे पालख्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला रवाना झाले होते. या पालख्यांमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून वारीच्या कालावधीत १४ लाख २८ हजार १२० वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. यातील ६ हजार ९८९ वारकऱ्यांवर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. या दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या १४ लाख २८ हजार १२० वारकऱ्यांवर विविध आरोग्य केंद्र, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य शिबीराच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. यातील १४ लाख २१ हजार १३१ वारकऱ्यांवर बाह्यरुग्ण विभागात तर ६ हजार ९८९ आंतररुग्ण विभागात उपचार करण्यात आले. आळंदीहून निघालेली श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीतील ४ लाख ३७ हजार १०७ वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले. त्याखालोखाल देहू येथून निघालेली श्री संत तुकाराम महाराज दिंडीतील ३ लाख ४३ हजार ३०६ वारकरी आणि सासव येथून निघालेली श्री संत सोपान काका महाराज दिंडीतील ५५ हजार २८५ वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले. वारीनिमित्त विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीरे घेण्यात आली आहेत. या शिबीरात ४ लाख ८६ हजार ७३० वारकऱ्यांवर बाह्यरुग्ण विभागात तर २१७८ वारकऱ्यांवर आंतररुग्ण विभागात उपचार करण्यात आले. महाशिबीरात नेत्रविकार, हृदयरोग, मूत्रपिंड, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, कर्करोग या सारख्या रोगावर उपचार करण्यात आले. तसेच ज्या वारकऱ्यांना शस्त्रक्रिया व अतिविशेषोपचार सेवेची आवश्यकता भासली त्यांची स्वतंत्र यादी करून, सर्वांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.