शिक्षण

ठाण्यात आटीई प्रवेशासाठी ९५९७ विद्यार्थ्यांची निवड; २३ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू

ठाणे :

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी २० जुलै २०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीनुसार ठाणे जिल्ह्यासाठी ६४३ शाळांमध्ये ९५९७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ६४३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ११ हजार ३३९ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांनी महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालय यांनी जनहित याचिका व रिट याचिकेवर १९ जुलै २०२४ रोजी अंतिम निर्णय दिला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ७ जून २०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी २० जुलै २०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ६४३ पात्र शाळांमध्ये एकूण १९ हजार ५६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९ हजार ५९७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

पालकांना येणार संदेश

या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर २२ जुलै २०२४ पासून संदेश (एसएमएस) येण्यास सुरुवात होईल.

असा घ्या प्रवेश

प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झालेल्या पालकांनी संकेतस्थळावर जाऊन प्रवेश पत्राची प्रिंट घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या संबंधित तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रति घेऊन जावे. समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संबंधित संकेतस्थळावर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून त्याचा प्रवेश निश्चित झालेला आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन ठाणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *