गुन्हे

आजीच्या धाडसामुळे पोलिसांनी दाेन चोरांना पकडले

ठाणे :

कळवा येथील खारेगावमधील एका ७३ वर्षाच्या आजी गीता पवार यांच्या धाडसामुळे कुणाल सुनिल पाटील आणि अविनाश सुनिल पाटील या दोन चोरांना रंगेहाथ पकडण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. या चोरांकडून २० ग्रॅमची ८० हजारांची सोन्याची बांगडीही हस्तगत केल्याची माहिती कळवा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.

गीता पवार या १८ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी खारेगाव नाक्याहून दत्तवाडीकडे जाणाऱ्या ठाणे परिवहन सेवेच्या बसने स्वामी समर्थांच्या मठाकडे चालल्या होत्या. त्यांच्या हातात प्रत्येकी दोन- दोन तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या होत्या. त्यावेळी बस स्टॉपवर उभे असलेल्या तीन चोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्या बसमध्ये चढतानाच तिघांपैकी एका चोराने कैचीने त्यांच्या एका हातातील बांगडी तोडली. लगेच त्यांनी सावधगिरीने स्वत:ला सावरत हात खेचला आणि बसमध्ये चढल्या. आरडाओरडा करण्यापूर्वीच बस चालू झाली होती. त्यांनी मागे वळून एका चोराला पाहिले होते. लगेच काही अंतरावरच पुढे जाऊन त्या बसमधून उतरल्या आणि एका मोटरसायकलस्वाराकडे मदत मागून पुन्हा खारेगाव बस स्टॉपकडे आल्या. त्याचवेळी कळवा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार आप्पासाहेब खेडकर आणि सागर डामसे हे त्या ठिकाणाहून गस्तीवर जात असताना त्यांना ही माहिती पवार यांनी दिली. ही वृद्ध महिला बसमधून गेल्यामुळे ती परत येणार नाही, अशा विचारातच असलेले चोरटे तिथेच एका बाजूला उभे होते. पवार यांनी त्यांना ओळखले आणि पोलिसांना दाखवले. पोलिसांना बघून ते पळ काढत होते, पण पाठलग करून खेडकर आणि डामसे यांनी त्यांच्यापैकी दोघांना पकडले. चौकशीमध्ये तिघांपैकी कुणाल आणि अविनाश गायकवाड हे दोघे भाऊ अंबरनाथहून इथे हाफ चड्डीवर हत्यारांसह चोरी करायला आले होते.

कळवा पोलिसांकडे सध्या रस्त्यावरील चोरीच्या अनेक तक्ररी होत्या. पण चोरटे हुलकावणी देत होते. पवार यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे दोन चोरांना पकडण्यात आले असून त्यांचा तिसरा साथीदार मात्र पसार झाला. त्यांची तुटलेली २० ग्रॅमची सोन्याची बांगडी पोलिसांनी हस्तगत केली आहे. ती पवार यांना लवकरच परत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोठया धाडसाने कसलीही भीती न बाळगता चोरांना पकडून देणाऱ्या पवार यांच्यासह बिट मार्शल पाेलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *