मुंबई :
सतत होत असलेल्या पावसामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यामध्ये महिनाभरात मलेरियाचे २ हजार ९२४ रुग्ण सापडले, असून मलेरियाच्या रुग्णांची संख्या ७ हजार ४४७ इतकी झाली आहे. तसेच मलेरियाचे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे डेंग्यूचे २ हजार १६३ रुग्ण सापडल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ४ हजार ९६५ इतकी झाली आहे. तसेच डेंग्यूने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मलेरिया व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याला फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये २१ जून ते १८ जुलै या एक महिन्याच्या कालावधीत मलेरियाचे २ हजार ९२४ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये गडचिरोलीमध्ये सर्वाधिक १ हजार ८२६ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल मुंबईमध्ये ६५७ रुग्ण, चंद्रपूरमध्ये १०५ रुग्ण आणि पनवेलमध्ये ३७ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे जुलैमध्ये हिवतापाने तीन जणांचा मृत्यू झाला असून, हे तिन्ही मृत्यू गडचिरोलीमध्ये झाले आहेत.
मलेरियाप्रमाणे डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. २१ जून ते १८ जुलै या एक महिन्याच्या कालावधीत राज्यात डेंग्यूचे २ हजार १६३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १८ जुलैपर्यंत ३ हजार १६४ इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ३९४ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये २९७ रुग्ण, नाशिकमध्ये २३८ रुग्ण, रायगडमध्ये १०३ रुग्ण, रत्नागिरीमध्ये ६१ रुग्ण आणि पालघरमध्ये ४५ रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत राज्यात डेंग्यूने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ
मलेरिया व डेंग्यूप्रमाणे यावर्षी चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. २१ जून ते १८ जुलै या एक महिन्याच्या कालावधीत राज्यात ३३४ रुग्ण चिकुनगुनियाच्या सापडले आहेत. गतवर्षी जुलैपर्यंत राज्यात ३६३ रुग्ण सापडले होते. यावर्षी राज्यात आतापर्यंत चिकुनगुनियाचे १०७५ रुग्ण सापडले आहेत. मात्र गतवर्षी संपूर्ण वर्षभरात १७०२ रुग्ण सापडले होते.