शहर

पाच वर्षात उपनगरीय रेल्वे मार्गावर २५० लोकल फेऱ्या वाढणार : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

मुंबई :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५ हजार ९४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बुलेट ट्रेन, रेल्वे उड्डाणपूल, १२८ स्थानकांचा अमृत भारत स्थानकांतर्गत पुर्नविकास, मुंबईतील चार मेगा टर्मिनलमुळे रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच पुढील पाच वर्षात उपनगरीय रेल्वे मार्गावर लोकलच्या २५० नवीन फेऱ्यांची भर पडणार असल्याचे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यापासून राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळाली आहे. राज्यात सध्या ८१ हजार ५८० कोटी रुपयांचे ५ हजार ८७७ किलोमीटरच्या ४१ प्रकल्पांचे काम सुरु आहे. या तुलनेत युपीए सरकारच्या काळात रेल्वेसाठी ११ हजार कोटी रुपये देण्यात येत होते. मात्र यंदा मोदी सरकारने १५ हजार ९४० कोटी महाराष्ट्राला दिले असल्याचे वैष्णव म्हणाले.

अमृत भारत स्थानकांतर्गत राज्यातील १२८ स्थानकांचा पुर्नविकास करण्याचे काम सुरु आहे. तसेच राज्यातील रेल्वेचे सध्या १०० टक्के विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. तर वर्षाला १८० किलोमीटर नविन रुळ टाकण्यात येतात. रेल्वेची राज्यात सध्या १ लाख ३० हजार कोटीची गुंतवणुक असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.

पाच वर्षात २५० लोकल फेऱ्या वाढणार

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज ३ हजार २१३ फेऱ्या चालविण्यात येतात. त्यापैकी मध्य रेल्वेवर दररोज १ हजार ८१९ तर पश्चिम रेल्वेवर १ हजार ३९४ लोकल चालविण्यात येतात. त्यातून अनुक्रमे ४० आणि ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. विविध प्रकल्पांमुळे पुढील पाच वर्षात उपनगरीय रेल्वे मार्गावर लोकलच्या २५० फेऱ्यांची भर पडणार आहे.

दोन गाड्यांमधील अंतर कमी होणार

लोकलच्या अधिकाधिक फेऱ्या चालविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अनेक निर्णय घेत आहे. त्यामध्ये दोन गाड्यांमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. क्रास ओव्हर कमी करण्यासह विविध तांत्रिक अडचणी सोडविण्यात येत असून सध्या दोन लोकलमध्ये १८० सेकंदाचा वेळ १५० सेकंदाच्या अंतराने चालविण्यात येतील.यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत.

बुलेट ट्रेनमुळे वाहतुकीसह शहरांचा विकास

मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील ५०८ किमी बुलेट ट्रेनचे काम सध्या वेगाने सुरु आहे. मुंबईतील बीकेसी येथून बुलेट ट्रेन सुरु होउन अहमदाबादमधील साबरमती येथे संपणार आहे. बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या पहिल्या भूमिगत स्थानकाचे काम वेगाने सुरु आहे. हे स्थानक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात येत असून आहे. तसेच ठाणेतील समुद्राखालून २१ किलोमीटर बोगदा करण्याचे काम सुरु आहे. तसेच ३२० किलोमीटर अंतराचे वाय डक्ट उभारण्याचे काम पूर्ण झाले असून बुलेट ट्रेन कडे केवळ वाहतुकीचे साधन म्हणून न पाहता महत्वाच्या शहरांना जोडणारी सुविधा म्हणून पाहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

कवचचा मार्ग मोकळा

संशोधन रचना आणि मानक संस्था (आरडीएसओ)द्वारे कवच ४.० ला मंजुरी मिळाली आहे. यामुळे स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणालीच्या स्थापनेचा वेग वाढणार आहे. कवचमध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ऑप्टिकल फायबर सारखे अनेक घटक असतात.

कुर्ला -सीएसएमटी दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गिकेवर लक्ष

मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकलचा वेग वाढविण्यासाठी पाचवी सहावी मार्गिका उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पातील कुर्ला आणि परेल स्थानकादरम्यान सायन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पाचव्या सहाव्या मार्गिकेतील अडथळा पूर्ण होईल. भायखळा ते सीएसएमटी दरम्यान जागेअभावी पाचवी सहावी मार्गिका उभारणे कठीण आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गिकांमध्ये बदल करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. यामुळे या मार्गिकेसाठी कमी भूसंपादनाची गरज भासणार आहे.

महामुंबईत चार नवी टर्मिनस

मध्य रेल्वेने नव्या टर्मिनससाठी मुलुंड,परळ,ठाकुर्ली ही संभाव्य ठिकाणे निश्चित केली आहे. पश्चिम रेल्वेवरील नव्या टर्मिनससाठी वसई रोड परिसरातील टर्मिनस प्रस्तावित केला आहे. मेगा टर्मिनसकरिता अंदाजे ७.५ एकर जमिनीची आवश्यकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *