महाड :
प्रादेशिक हवामान विभागाने २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता जारी करण्यात आलेल्या चेतावणीनुसार रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड-पाली या तालुक्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार २४ जुलै २०२४ रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा दिला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड-पाली या तालुक्यांमध्ये २४ जुलैच्या रात्रीपासून अतिवृष्टी झाली आहे. तसेच समुद्रास असलेल्या भरतीमुळे कुंडलिका, अंबा व सावित्री या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले आहे. तसेच २५ जुलै रोजी सुद्धा रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेत महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड-पाली या तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना २५ जुलै २०२४ रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड आपत्तीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुट्टी जाहीर केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.