मुंबई :
मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्गावर असणाऱ्या खड्डयांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. तसेच दोन्ही महामार्गावरील बायपास, सर्व्हीस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १० ऑगस्टनंतर दोन्ही महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी भेट देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार किशोर दराडे, भरत गोगावले, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव आय.एस.चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्रीवास्तव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की गणेशोत्सवादरम्यान मुंबई- गोवा महामार्गावरुन लाखो चाकरमनी कोकणात जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. मुंबई- गोवा महामार्गावरील शक्य तेवढ्या मार्गाचे रुंदीकरण करुन वाहतूक गतिमान होईल, याकडे लक्ष द्यावे. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, दरडप्रवण असणाऱ्या परशूराम घाटात मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेच्या धर्तीवर सुरक्षा जाळ्या लावाव्यात. ज्या भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाले असेल तेथील बांधकाम साहित्य हटवून रस्ता मोकळा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
माणगांव, इंदापूरमधील वाहतूक कोंडी कमी करा
गणेशोत्सवादरम्यान माणगांव, इंदापूर या शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. गणेशभक्तांच्या सोईसाठी महामार्गावर दर १० किमी अंतरावर वैद्यकीय मदत कक्ष आणि वाहन दुरुस्तीची व्यवस्था करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुंबई-नाशिक महामार्गाच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नाशिक महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, की या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खड्डे बुजवण्याबरोबर भिवंडी परिसरातील रस्त्यावर उभे असणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्कींगसाठी व्यवस्था करावी. मुंबई ते नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे ओळखून त्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीने करावे, यासाठी महामार्ग प्राधिकरणाने ठाणे जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत देखील संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.