मुंबई :
निवासी डॉक्टर, अध्यापक, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर रुग्णालयातील यंत्रसामुग्री यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांची भरती करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून घेण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील परिशिष्ट अ मध्ये नमूद १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयात प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच संस्थेमधील प्राध्यापक/सह प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्या सुरक्षेच्यासाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार सुरक्षा अधिकारी २, सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी १, सुरक्षा निरीक्षक २, सुरक्षा पर्यवेक्षक १३ आणि सुरक्षारक्षक ८१३ अशी एकूण ८३१ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व सुरक्षा रक्षक महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित पुणे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ, पुणे जिल्हा सुरक्षारक्षक महामंडळ यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक भरण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून सर्व भत्त्यांसह ३० कोटी ५४लाख ९७ हजार ९१३ रुपयांच्या वार्षिक खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.