मुंबई :
एसएनडीटी महिला विद्यापीठाने आज एक ऐतिहासिक दिवस पाहिला. या दिवशी कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव यांना मानद कर्नल पद प्रदान करण्यात आले. या विशेष समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल विरेंदर सिंह, व्हीएसएम यांची उपस्थिती होती. समारंभाला प्रारंभ करताना एसएनडीटीच्या एनसीसी कॅडेट्सने गार्ड ऑफ ऑनर प्रदान केले. त्यानंतर विद्यापीठाचे गाणे आणि प्र-कुलगुरु प्रा. रुबी ओझा यांचे स्वागत भाषण झाले. यावेळी इतर एनसीसी अधिकाऱ्यांचेही प्रा. ओझा आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
एनसीसी कॅडेट्सने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यानंतर कुलगुरुंच्या संक्षिप्त जीवनावर प्रकाश टाकण्यात आले. यानंतरच होणाऱ्या पिपिंग सेरेमनीमध्ये कुलगुरूंना मानद कर्नल पद प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या भाषणात शिक्षण क्षेत्रातल्या आपल्या प्रवासाबद्दल सांगितले. त्यांनी आपल्या कुटुंबियांना विशेष धन्यवाद व्यक्त केले. तसेच विद्यार्थी वर्गाला सशस्त्र दलांमध्ये जाण्याचे आवाहन केले. त्यांनी २५ व्या कारगिल विजय दिनाचा उल्लेख करत एनसीसीची आजच्या युगातली महत्वाची भूमिका अधोरेखित केली. यावेळी त्यांचे पती शिरीष चक्रदेव, मोठा मुलगा लेफ्टनंट कर्नल चैतन्य चक्रदेव आणि धाकटा मुलगा सनित चक्रदेव उपस्थित होते.
प्रमुख अतिथी मेजर जनरल विरेंदर सिंह यांनी आपल्या भाषणात प्रा. चक्रदेव यांच्या शिक्षण आणि एनसीसी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी तरुणींना एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आणि मुलींना एनसीसीमधून देशसेवेची संधी असल्याचे सांगितले. समारंभ एनसीसी गाण आणि राष्ट्रगीताने संपन्न झाला.