माणगाव :
मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १७ वर्षांपासून चालु असून अद्यापही पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. कोकणातील सर्व संघटना आपापल्या परीने आंदोलनाच्या माध्यमातून लढा लढत आहेत. त्याची काही अंशी निकाल देखील सकारात्मक आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगाने मार्गी लागावे यासाठी कोकणवासीयांनी रविवारी माणगाव एसटी स्थानकाजवळ सकाळी ११ वाजता होमहवन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. मागील १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाचे काम अद्यापही अनेक ठिकाणी अर्धवट असल्याने कोकणवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोकणातील सर्व संघटनांना सोबत घेऊन जन आक्रोश समिती अंतर्गत ही परिस्तिथी लवकरात लवकर कशी संपुष्टात येईल व कोकणवासीयांचा प्रवास सुरक्षित व सुखकर होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गाला लागलेली वाईट नजर काढण्यासाठी, गाऱ्हाणे घालण्यासाठी २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता माणगाव एसटी स्थानकाजवळ होम हवन करण्याचा निर्णय जन आक्रोश समितीने घेतला आहे. होम हवनच्या कार्यक्रमाला अधिकाधिक काेकणवासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.