नवी दिल्ली :
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी आज संसदेत मिठागरांच्या जमिनीबाबत मुद्दा मांडून या जमिनी विकासकाला देण्याबाबत जोरदार आक्षेप नोंदविला. या ठिकाणी बांधकाम झाल्यास पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली असून या जागा स्थानिक लोकांच्या सोयी सुविधांसाठी देण्यात याव्यात अशी विनंती त्यांनी संसदेत केली.
धाराविकरांचे पुनर्वसन करण्यासाठी मुलुंड मधील २५३ आणि महानगर पालिकेच्या ताब्यात असलेली ७५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. या जागेवर लाखो धारावीकरांचे पुनर्वसन करण्याची शासनाची योजना आहे. त्यासाठी मुलुंड, भांडुप, विक्रोळी मधील मिठागरांच्या जागेवर राज्य शासनाची नजर आहे. याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी आज संसदेत मिठागरांच्या जागेबाबत मुद्दा मांडला. या जागेवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले तर पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रोजक्टला आमचा विरोध असून या जागेचा वापर केवळ ईशान्य मुंबईतील मतदारांसाठी करण्यात यावा, तसे न झाल्यास स्थानिक लोकांना त्याचा सर्वात जास्त त्रास होईल, त्यामुळे येथील जागा कोणालाही बांधकामासाठी देण्यात येऊ नये अशी विनंती खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत केली. शिवाय धाराविकरांचे पुनर्वसन धारावितच करण्यात यावे, अशी मागणी धारावीकरांनी केली आहे. असे असतानाही त्यांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागेवर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे.
दरम्यान, लाखो धाराविकरांचे मुलुंड मध्ये पुऩर्वसन झाले तर येथील नागरी सुविधांवर याचा ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रोजक्टला स्थानिक मुलुंडकरांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला असून गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी उपोषण, आंदोलन करण्यात येत आहे. खासदार संजय दिना पाटील यांना दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ईशान्य मुंबईतील जनतेचे आभार मानले.