मुंबई :
श्रावण महिना सुरू झाला की सर्वांना आपल्या लाडक्या बाप्पाचे वेध लागतात. बाप्पाच्या स्वागतासाठी (Ganeshotsav) तयारी सुरू होते. त्यामुळे येत्या काही दिवसांतच आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई नगरी सज्ज होईल. मुंबईतील विविध गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांनी बाप्पाचे पाटपुजन करून त्याच्या आगमनाच्या तयारीला सुरुवात केली आहे. बाप्पासाठी आकर्षक देखावे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळख असलेला लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे बाप्पाच्या स्वागतासाठी (Ganeshotsav) सज्ज झाले आहे. गणेशोत्सवामध्ये (Ganeshotsav) दरवर्षी देशातील विविध प्रसिद्ध तीर्थस्थळे, राजवाडे, गडकोट, प्रेक्षणीय स्थळांचे देखावे तयार करून गणेशभक्तांना त्याचे दर्शन या मंडळाकडून घडवले जाते. आपली ही परंपरा कायम ठेवत यंदाही या मंडळातर्फे उज्जैनचे महाकाल मंदिर साकारण्यात येणार आहे. मंडळाकडून हुबेहुबे प्रतिकृती साकारण्यात येत असल्याने भाविकांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याचा अनुभव येतो. त्यामुळे यंदा गणेशाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना उज्जैनच्या महाकाल मंदिराचे दर्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे.
दरवर्षी आपल्या उंच मूर्ती आणि विविध देखाव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली या मंडळाने चक्क उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा साकारणार आहे. सालाबादप्रमाणे आपली परंपरा जपत गुरु पौर्णिमाचे औचित्य साधून ‘मुंबईच्या राजा’चा अनेक गणेश भक्तांच्या साक्षीने पाद्यपूजन सोहळा पार पडला. याच शुभ दिनी मंडळाच्या वतीने यंदाच्या देखाव्या संदर्भात घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण देखावा साकारण्यात येणार आहे. या देखाव्या संदर्भात मंडळाकडून एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
‘मुंबईचा राजा’ची मूर्ती साकारणार सतीश वळीवडेकर
गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षी देखील मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार सतीश वळीवडेकर-गजमुख आर्ट्सची संपूर्ण टीम हा बाप्पा साकारणार आहे. या अगोदर मूर्तिकार विजय खातू, मनोहर बागवे, दीनानाथ वेलींग (मास्टर) अशा अनेक दिग्गज मूर्तिकारांनी ‘मुंबईच्या राजा’ची मूर्ती साकारली आहे. दरवर्षी आपल्या भव्य व आकर्षक मूर्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘मुंबईच्या राजा’चे यंदाचे स्वरूप कसे असणार हे पाहण्यासाठी सर्वच मुंबईकर उत्सुक आहेत.
गेले ९७ वर्षांची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. तसेच यंदाच्या वर्षी देखील भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
– स्वप्नील परब, सचिव, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली