मनोरंजन

‘रघुवीर’ चित्रपट २३ ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित

मुंबई :

महाराष्ट्राला महान साधू-संतांची थोर परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील संत समर्थ रामदास स्वामी यांची थोरवी खूप मोठी आहे. सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दासबोधसारखा महान ग्रंथ लिहिणारे तसेच सुखकर्ता दुःखहर्ता हि दैनंदिन पूजेतील आरती रचणारे समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘रघुवीर’ या आगामी चित्रपटाद्वारे समर्थांचा महिमा जगासमोर येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक नवीन पोस्टर रिलीज करून घोषित करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी ‘रघुवीर’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘रघुवीर’ची निर्मिती डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगानं समर्थ क्रिएशन्स यांनी केली आहे. अभिनव विकास पाठक या चित्रपटाचे निर्माते असून वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॉ. किरण छगन बडगुजर सहनिर्माते आहेत. खुशी अॅडव्हरर्टायझिंग आयडियाज प्रा. लि. या चित्रपटाचे मार्केटिंग पार्टनर असून सिनेपोलिस या चित्रपट वितरण समूहाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निलेश कुंजीर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘रघुवीर’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासून कायम चर्चेत राहिला आहे. समर्थांच्या भूमिकेत अभिनेते विक्रम गायकवाड दिसणार असल्याचे उघड झाल्यानंतर ‘रघुवीर’बाबतची उत्सुकता आणखी वाढली. ‘जय जय रघुवीर समर्थ’चा मंत्र जपत २३ ऑगस्ट या दिवशी ‘रघुवीर’ सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचं नुकत्याच रिव्हील केलेल्या पोस्टरवर पाहायला मिळतं. याबाबत दिग्दर्शक निलेश कुंजीर म्हणाले की, समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणणे हे एक फार मोठे आव्हान आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांसोबतच इतिहासकालीन साहित्याचा अभ्यास करून मोठ्या पराकाष्ठेने रामदास स्वामींना पडद्यावर सादर केले जाणार आहे. इतर चित्रपटांप्रमाणे हे काम लगेच होणारे नसल्याने व्यवस्थित वेळ घेऊन सर्व काम पूर्ण करून एक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवण्यात येतेय. महत्त्वाचे म्हणजे या सिनेमातलं मुख्य पात्र हे हिरो म्हणून न वावरता सर्वसामान्य माणसाप्रमाणे ते दिसेल आणि त्यातूनच सामान्यातला असामान्य अशा संत समर्थ रामदास स्वामींचं दर्शन घडवेल अशी भावनाही निलेश कुंजीर यांनी व्यक्त केली.

या चित्रपटाची पटकथा निलेश कुंजीर आणि संगीत नाटक अकादमी पारितोषिक विजेते अभिराम भडकमकर यांनी लिहिली आहे. संवादलेखनाची जबाबदारी अभिराम भडकमकर यांनी सांभाळली असून सचिन सुहास भावे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटात विक्रमसोबत ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने आदी कलाकारही विविध व्यक्तिरेखांमध्ये दिसतील. डिओपी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *