क्रीडा

राज्य कॅरम स्पर्धेत संदीप – काजल अंतिम जेते 

पुणे :

सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती आयोजित सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या मान्यतेने कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड,पुणे येथे आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या  विश्वविजेत्या संदीप दिवेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा अटीतटीच्या लढतीत २५-१५, ०-२५, १७-१३ असा पराभव करून विजेतेपद मिळविले.

तिसऱ्या सेटमध्ये सातव्या बोर्डनंतर संदिपकडे ७ गुणांची आघाडी होती. मात्र आठव्या आणि शेवटच्या डावाची सुरुवात करण्याचा मोका म्हणजे ब्रेक अभिजितचा असल्याने अंतिम बोर्ड अभिजितला मोठ्या फरकाने जिंकण्याची संधी होती. परंतु अनुभवच्या फायदा उठवत संदीपने केवळ ३ गुणांचा बोर्ड अभिजितला दिला आणि सामना व रोख रुपये २५ हजारांचे ईनाम व चषक आपल्या खिशात घातले. दुसरीकडे महिला एकेरीचा सामना अगदीच एकतर्फी झाला. मुंबईच्या आंतर राष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीने मुंबईच्या अंबिका हरिथवर १६-२, १९-११ असा सहज विजय मिळवून रोख रुपये ८ हजरांचे ईनाम व चषक पटकाविले.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या सामन्यात पुण्याच्या रहिम खानने ठाण्याच्या झैद अहमदला २५-१९, २५-८ असे हरविले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या उर्मिला शेंडगेने मुंबईच्या रिंकी कुमारीवर २५-४, २०-१५ अशी मात केली.  विजेत्या खेळाडूंना पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, क्रीडा जागृतीचे मुख्य प्रताप जाधव, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव अभिजित मोहिते, सदस्य संतोष चव्हाण आणि कॅरम असोसिएशनचे सचिव नंदू सोनावणे उपस्थित होते. मुख्य आयोजक सनी निम्हण यांनी प्रतिवर्षी राज्य पातळीवरील सामने भरविण्याची घोषणा स्पर्धेच्या सुरुवातीलाच केली होती. त्यावर प्रताप जाधव यांनी शेवटच्या दिवशी शिक्कमोर्तब केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *