शहर

Mumbai goa highway : मुंबई – गोवा महामार्गाची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घ्यावी – शिवसेना शिंदे गटाची मागणी

डोंबिवली :

देशात मोठ्या प्रमाणावर महामार्ग बांधणाऱ्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना रोडकरी असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे निर्माण करणाऱ्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (dr. Shrikant shinde) यांना इन्फ्रामॅन म्हणून संबोधले जाते. आपल्या लोकसभा क्षेत्रातील अनेक रखडलेले विकासाचे प्रकल्प त्यांच्या कार्यकुशलतेच्या जोरावर त्यांनी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे गेली १५ ते २० वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची (mumbai goa highway) जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी घ्यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी करीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना एक प्रकारे डिवचले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या कोकणातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यांना मुंबई-गोवा महामार्गाची (mumbai goa highway) जबाबदारी आपण घ्यावी, अशा प्रकारचे निवेदन दिले आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला आहे. कोकणातील चाकरमानी हा प्रत्येक सणाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या सणाला गावाला जात असतो. मात्र कोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्ग गेली १५ ते २० वर्षे रखडलेला आहे. दरवेळी रस्ता लवकर पूर्णत्वाचे आश्वासन दिले जाते, मात्र रस्ता काही पूर्णत्वास जात नाही.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघात यापूर्वी रस्त्यांची दुरवस्था होती. अनेक ठिकाणी रखडलेले रस्त्यांवर सिमेंटच्या रस्त्यांचे अल्पावधीत जाळे निर्माण केले. गेले अनेक वर्ष रखडले प्रकल्प पूर्ण होतील, असे स्वप्नातसुद्धा वाटत नव्हते. परंतु प्रशासनाबरोबर समन्वय आणि सततचा पाठपुरावा करीत त्यांनी लोकसभा मतदारसंघात सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे निर्माण केले. कोकणातील रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतल्यास ते नक्कीच हा महामार्ग लवकर पूर्णत्वास नेतील, असा विश्वास सेनेच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.

महामार्ग पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, उपशहर प्रमुख दीपक भोसले, दिनेश शिवलकर, संतोष तळाशीलकर इ. कोकणातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अशा प्रकारची मागणी म्हणजे एकप्रकारे भाजपला डिवचण्याचा प्रकार असल्याने त्यावरून आता शिवसेना भाजपमध्ये जुंपली आहे.

मंत्र्यांकडून चाकरमान्यांना खोटी आश्वासने देऊन बोळवण

मुंबई-गोवा महामार्गाची (mumbai goa highway) जबाबदारी गेल्यावर्षीपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे आहे. मात्र गेल्या वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. गणेशोत्सव जवळ आला की, पावसाळ्यात जसे अनेक बेडकं डराव डराव करतात, तसे काही नेते या रस्त्यावर उतरतात आणि चाकरमान्यांना आश्वासनांचे गाजरे दाखवितात, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. आतापर्यंत येथील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी फक्त चाकरमान्यांना खोटी आश्वासने देऊन एकाप्रकारे बोळवणच केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *