आरोग्य

फॉर्म्युल्यापेक्षा बाळासाठी स्तनपान अधिक फायदेशीर

आईचे दूध हा बाळाच्या अन्नाचा नैसर्गिक स्रोत आहे. आईचे दूध हे बाळाला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संक्रमणाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिपिंडांनी भरलेले असते. आईच्या दुधात चरबीचे प्रमाण सुद्धा कमी असते. फॉर्मुला घेणाऱ्या बाळांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त दूध घेण्याची शक्यता असते, तसे स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये होत नाही. आईचे दूध बाळाला वेगवेगळ्या चवींसाठी तयार करते. आईच्या आहारानुसार दुधाची चव बदलत असल्याने बाळ मोठे होऊन पोषक पदार्थ खाऊ लागते. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे बाळाला रोगप्रतिकारक शक्ती आईच्या दुधामुळे मिळते. जेव्हा जेव्हा बाळ आजारी पडते आणि संसर्ग आईला सुद्धा होतो तेव्हा तिचे शरीर बाळामध्ये संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिपिंड तयार करू शकते. ही प्रतिपिंडे आईच्या दुधाद्वारे बाळाला पुरवली जातात.

कोलोस्ट्रमचे फायदे

कोलोस्ट्रम हे स्तनांद्वारे तयार केले जाणारे पहिले दूध आहे. काही तज्ज्ञ ह्यास ‘हाय ऑक्टेन मिल्क’ देखील म्हणतात. हे दूध कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि प्रतिपिंडांनी समृद्ध असते. प्रमाण कमी असल्याने, हे बाळासाठी अगदी योग्य असे पहिले अन्न आहे. जेव्हा बाळ कोलोस्ट्रमचे स्तनपान करते, तेव्हा ते पहिले लसीकरण केल्यासारखेच असते, कारण कोलोस्ट्रम अँटीबॉडीज आणि इम्युनोग्लोबुलिनने समृद्ध असते. ते रेचक म्हणून देखील कार्य करते आणि बाळाला त्याचे पहिले मल उत्सर्जित करण्यास मदत करते. त्याद्वारे बिलिरुबिन शरीराच्या बाहेर फेकले जाते आणि बाळाला कावीळ होत नाही.

कोलोस्ट्रम नैसर्गिक लस म्हणून काम करते

कोलोस्ट्रम एक नैसर्गिक लस म्हणून काम करते कारण त्यात रोगप्रतिकारक घटकांचे प्रमाण सर्वाधिक असते. हे घटक बाळाला संसर्गापासून वाचवतात. गर्भाशयात असताना, बाळाची नाळ, बाळाच्या रक्ताभिसरण प्रणालीला इम्युनोग्लोब्युलिन जी(आयजीजी) नावाच्या प्रतिपिंडाचा पुरवठा करत राहते. ही प्रतिपिंडे रोगांशी लढा देण्यास मदत करतात. जन्माला आल्यावर, कोलोस्ट्रम बाळाला इम्युनोग्लोब्युलिन ए (आयजीए) नावाच्या दुसऱ्या प्रतिपिंडांचा पुरवठा करतात. त्यामुळे बाळाचा घसा, फुफ्फुस आणि आतड्यांतील श्लेष्मल त्वचा यासारख्या भागांना संरक्षण मिळते. नवजात बाळाचे आतडे हे पारदर्शक असते. कोलोस्ट्रममुळे बाळाचे बाहेरील घटकांपासून संरक्षण होते. पचनसंस्थेवरील छिद्रांवर कोलोस्ट्रमचा थर हे कार्य करते. कोलोस्ट्रममध्ये ल्युकोसाइट्स नावाच्या संरक्षणात्मक पांढऱ्या पेशी देखील जास्त असतात. या पेशी सूक्ष्मजंतूंपासून बचाव करतात.

आईसाठी स्तनपानाचे फायदे

मूल आणि आई दोघांच्याही फायद्यासाठी स्तनपानाची शिफारस केली जाते. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे बरेच फायदे होतात

१. भावनिक पूर्तता आणि बंधन

बहुतेक मातांना त्यांच्या बाळाच्या संगोपनातून निर्माण झालेल्या भावनिक बंधनामुळे आनंद आणि समाधानाची भावना असते. बाळाला स्तनपान देताना ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. या संप्रेरकांमुळे बाळाशी प्रेम आणि आसक्तीच्या भावना वाढवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, प्रोलॅक्टिन नावाचे संप्रेरक आईपणाची भावना वाढवते आणि बाळाचे पालनपोषण करण्याची गरज निर्माण करते.

२. स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो

अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आलेले आहे कि ज्या स्त्रिया स्तनपान करतात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका २५ % पर्यंत कमी होतो. हा धोका स्त्रीच्या आयुष्यादरम्यान केलेल्या स्तनपानाच्या एकूण कालावधीच्या प्रमाणात असतो. म्हणजेच, ज्या स्त्रियांनी सर्वाधिक महिने स्तनपान केले आहे, त्यांना हा धोका सर्वात कमी असतो.

३. प्रसूतीनंतरच्या समस्या कमी करते

स्तनपान देणाऱ्या स्त्रिया बाळंतपणानंतर लवकर आणि सहज बऱ्या होतात कारण ऑक्सीटोसिनसारखे हार्मोन्स गर्भाशयाला लवकर सामान्य स्थितीत येण्यास आणि प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करतात. प्रसूतीनंतरची उदासीनता कमी करणे आणि गरोदरपणात वाढलेले वजन सहजतेने कमी करणे हे देखील स्तनपानाचे फायदे आहेत.

४. गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो

ओव्हुलेशनला उशीर होत असल्याने, स्तनपान गर्भाशयाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यास मदत करते. संशोधकांच्या मते, जेव्हा ओव्हुलेशन वारंवार होते तेव्हा पेशी उत्परिवर्तनाचा धोका (ज्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो) जास्त असतो.

५. नैसर्गिक आणि सोयीस्कर

स्तनपानामुळे बाळाला नेहमीच ताजे आणि सुरक्षित दूध मिळते आणि ह्या दुधाचे तापमान देखील बाळासाठी योग्य असते. बाटल्या गरम करण्याची, उकळण्याची किंवा निर्जंतुकीकरण करण्याची गरज भासत नाही. बाळाला दूध देण्याच्या ह्या पद्धतीमध्ये कुठलाही त्रास नाही. ही पद्धत दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त उपयोगी आहे कारण तुम्हाला फॉर्म्युला तयार करण्यासाठी उठावे लागत नाही. स्तनपान देत असल्यास तुम्हाला तुमच्या बाळासोबत बाहेर जाणे सोपे होते, कारण सामानाने भरलेली पिशवी घेऊन जाण्याची गरज नाही.

६. खर्च होत नाही

फॉर्म्युला किफायतशीर नाही आणि ब्रँडनुसार फॉर्मुल्याच्या किमती बदलतात. तर स्तनपानादरम्यान, बाळाला दूध पाजण्यासाठी आईला दररोज फक्त ५०० कॅलरीजचा अतिरिक्त वापर करावा लागतो. बाटली आणि फॉर्म्युला फीडिंगमुळे अधिक संसर्ग देखील होतो, त्यामुळे वैद्यकीय बिले वाढतात.

७. नोकरदार महिलांसाठी सोयीस्कर

ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया बाळांना जवळच्या पाळणाघरामध्ये ठेवतात त्यांना ब्रेकच्या वेळात बाळाला स्तनपान करता येते. बाळाला द्यावयाचे दूध काढण्यासाठी आणि साठवण्यासाठी ब्रेस्ट पंप वापरला जाऊ शकतो.

८. पर्यावरणास अनुकूल

बाळाला फॉर्म्युला द्यायचा असल्यास त्यासाठी स्टोरेज कॅन आणि कंटेनर आवश्यक आहे आणि फॉर्म्युला तयार करण्यासाठी ऊर्जा देखील लागते. तसेच टाकून दिलेल्या बाटल्या आणि पॅकेट्समुळे कचरा देखील निर्माण होतो. स्तनपानामुळे कचरा किंवा प्रदूषण निर्माण होत नाही.

आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपानाचे शारीरिक आणि भावनिक फायदे आहेत. आईला काही वैद्यकीय कारणामुळे बाळाला स्तनपान देता आले नाही तरच बाळाला फॉर्मुला द्या अन्यथा बाळाला स्तनपान देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

लेखक : डॉ सुवर्णा खाडिलाकर आणि डॉ तुषार पालवे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *