मुंबई :
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा आपले ७० वे वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज यांच्या सहयोगाने इंडियन ऑइल आणि स्मॉल उत्कर्ष फायनान्स बँक पुरस्कृत रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे उदघाटन सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता मुंबई क्रिकेट असोसिएशनचे युवा अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या शुभ हस्ते होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे अध्यक्ष / सचिव जयंत पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऍपेक्स काउंसिल सदस्य अभय हडप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१२ ते १४ ऑगस्ट २०२४ अशा तीन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील २३६ पुरुष व ४४ महिला कॅरमपटूंनी भाग घेतला आहे. सोमवारी सकाळी पुरुष एकेरी गटाने सामन्यांना सुरुवात होईल तर महिला एकेरी गटाचे सामने मंगळवारपासून खेळविण्यात येतील. स्पर्धेतील पुरुष गटातील विजेत्याला ७० हजार तर महिला गटातील विजेतीला ३५ हजारांचे रोख ईनाम आणि चषक देण्यात येईल. दोनही गटातील पहिल्या ८ क्रमांकाच्या खेळाडूंना एकंदर २ लाख ७० हजारांची बक्षिसे असोसिएशनने जाहीर केली आहेत.
सहा बोर्डाचे ३ सेट असे या सामन्यांचे स्वरूप असून खेळाडूला प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीला थेट चढविता येणार नसल्याने हे सामने अधिक रंगतदार होणार असल्याचे असोसिएशनचे मत आहे. यामुळे सामना कमी वेळेत संपणार असल्याने क्रीडा रसिकांची ओढ कॅरमकडे वाढेल यासाठी हा बदल महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केला आहे. यापूर्व फेब्रुवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र कॅरम ओपन चॅलेंजर्स या स्पर्धेत हा प्रयोग यशस्वी झाल्याने यापुढे अशा स्पर्धा महाराष्ट्रात करण्याचा निर्णय असोसिशनने घेतला आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार असल्याने कॅरम रसिकांना घरबसल्या सामन्यांचा आनंद घेता येईल.
स्पर्धेतील मानांकने
पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान (मुंबई),२) विकास धारिया (मुंबई), ३) अभिजित त्रिपनकर (पुणे), ४) प्रशांत मोरे (मुंबई), ५) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ६) रहिम खान (पुणे), ७) झैद फारुकी (ठाणे) ८) पंकज पवार (मुंबई)
महिला एकेरी : १) काजल कुमारी (मुंबई), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे) ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) अंबिका हरिथ (मुंबई), ५) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ६) उर्मिला शेंडगे (मुंबई), ७) श्रुती सोनावणे (पालघर), ८) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग)