मुंबई :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या (Chief Minister-Maazhi Ladki Bahin Yojana) लाभाचे वितरण येत्या १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. ३१ जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Chief Minister-Maazhi Ladki Bahin Yojana) महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते. तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना (Chief Minister-Maazhi Ladki Bahin Yojana) ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या १७ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत. जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार/आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे.
या योजनेत आतापर्यंत १ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी (Chief Minister-Maazhi Ladki Bahin Yojana) ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.
१७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा (Chief Minister-Maazhi Ladki Bahin Yojana) अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. १७ ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Chief Minister-Maazhi Ladki Bahin Yojana) १ ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील (Chief Minister-Maazhi Ladki Bahin Yojana) अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.