मुंबई :
नागरिकांमध्ये रक्तक्षय (ॲनिमिया) आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी ‘रक्तक्षयमुक्त मुंबई’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यंदा या अभियानासाठी ‘लाल रंग कमाल रंग’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘रक्तक्षयमुक्त मुंबई’ अभियानासाठी बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान हिला सुद्धा अभियानात सहभागी करून घेतले आहे. स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या अभियानाचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी घोषित केल्यानुसार रक्तक्षय ही जागतिक पातळीवर भेडसावणारी आरोग्याची समस्या आहे. भारतात प्रामुख्याने तरूण मुली, मासिक पाळी येणाऱ्या किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि प्रसूती झालेल्या स्त्रियांमध्ये रक्तक्षय हा आजार आढळून येतो. रक्तक्षयामुळे रक्तातील हिमोग्लोबिनवर परिणाम होतो. परिणामी रक्तातील प्राणवायूच्या वहन क्षमतेवर परिणाम होतो. महिलांच्या शारीरिक रचनेनुसार मासिक पाळी आणि प्रसूती यासारख्या बदलांमुळे निघून जाणाऱ्या रक्ताचा परिणाम हा हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण कमी होण्यावर होतो. तसेच दगदगीची जीवनशैली व अनियमित आहाराच्या सवयी सुद्धा रक्तक्षयासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे रक्तक्षय आजाराबाबत सर्व वयोगटातील महिलांमध्ये जनजागृती करणे, या उद्देशाने ‘रक्तक्षयमुक्त मुंबई’ अभियान राबवण्यात येत आहे. महिलांनी रक्तक्षय आजारापासून मुक्त राहावे यासाठी हिरव्या पालेभाज्या, लिंबू, आवळा व जीवनसत्व सी युक्त फळे खावे, तसेच लोह आणि फॉलिक अॕसिडयुक्त गोळ्यांचे सेवन डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच करावे, असा सल्ला या अभियानात सहभागी होत असलेली अभिनेत्री सोहा अली खान हिने महिलांना चित्रफितीच्या माध्यमातून दिला आहे.
महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांच्यापर्यंत नियमितपणे आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व कार्यरत करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. तसेच किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये आढळणाऱ्या रक्तक्षय आजारासाठी चाचणी, औषधोपचार आणि सल्ला नियमितपणे उपलब्ध होईल यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.
महिलांनी नियमितपणे हिमोग्लोबिनची चाचणी करावी. तसेच सर्व महिलांनी आहारामध्ये लोहयुक्त, व्हिटॅमिन सी तसेच इतर पोषणमुल्ये असलेला आहार घ्यावा. मुंबई महानगरपालिका दवाखाने आणि आरोग्य केंद्र या ठिकाणी जावून मार्गदर्शन घ्यावे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध आणि गोळ्या घ्याव्यात.
– डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका