क्रीडा

५८ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : काजल – अनिल – मीनल – बाबुलाल राज्य कॅरम विजेते

मुंबई :

सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने आयोजित केलेल्या ५८ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुण्याच्या अनिल मुंढेने मुंबईच्या योगेश धोंगडेवर अंतिम सामन्यात सरळ दोन सेटमध्ये २५-१७, २४-११ अशी मात करत विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या फहिम काझीने मुंबई उपनगरच्या रिझवान शेखवर २०-१४, १६-१८ व २४-२१ असा निसटता विजय मिळविला.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईची काजल कुमारी विजेती ठरली. तिने ठाण्याच्या नवोदित मधुरा देवळेवर २५-०, २२-१७ असा एकतर्फी विजय मिळविला. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने सिंधुदुर्गच्या दिक्षा चव्हाणवर २०-२१, २५-६, २५-० असा विजय मिळविला. पुरुष वयस्कर गटातील अंतिम सामन्यात मुंबईच्या बाबुलाल श्रीमलने विजेतेपद पटकविताना मुंबई उपनगरच्या शब्बीर खानवर ६-२५, २०-५ व २५-१३ असा विजय प्राप्त केला. या गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या सत्यनारायण दोंतुलने मुंबई उपनगरच्या गिरीधर भोजवर ९-२५, ११-१० व २५-२१ अशी मात केली. महिला वयस्कर गटात अंतिम फेरीत ठाण्याच्या मीनल लेले – खरेने मुंबई उपनगरच्या माधुरी तायशेटेवर २५-०, २०-१६ अशी मात केली. तर तिसरा क्रमांक प्राप्त करताना कोल्हापूरच्या शोभा कामतने मुंबई उपनगरच्या जयमाला परबवर १७-१३, २५-९ असा विजय मिळविला.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार तसेच सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादरचे उपाध्यक्ष विजय सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतीन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, योगेश फणसळकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे खजिनदार संजय देसाई व सहसचिव संजय बर्वे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *