मुंबई :
दक्षिण मुंबईमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुद्धा संलग्नता जाहीर केली आहे. १९ ऑगस्ट रोजी त्यासंदर्भातील पत्रक विद्यापीठाकडून महाविद्यालयाला पाठवण्यात आले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, २४ ऑगस्टपासून शुल्क भरून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यामुळे आता जी.टी वैद्यकीय महाविद्यालय आता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ४ जुलै रोजी जी.टी. रुग्णालयाच्या परिसरात ५० विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर या महाविद्यालयाला महराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता मिळणे आवश्यक होते. त्यानुसार महाविद्यालय प्रशासनाकडून अर्ज करण्यात आल्यानंतर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने भेट देऊन सादर केलेल्या अहवाल आणि शैक्षणिक परिषदेच्या परवानगीनंतर महाविद्यालयाला २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले. त्यासंदर्भातील पत्र विद्यापीठाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १९ ऑगस्ट रोजी पाठवण्यात आले आहे. विद्यापीठाकडून संलग्नता मिळाल्याने जी.टी. रुग्णालयाच्या परिसरातील या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जी.टी. रुग्णलयाच्या परिसरातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्नता देताना नियम व अटींचे घातल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नियम व अटींची पूर्तता करणे, शासनाचे नियम व विद्यापीठाने केलेल्या सुधारणांची अमलबजावणी करणे महाविद्यालयाला बंधनकारक असणार आहे. शिक्षक भरतीसाठी विद्यापीठांची मान्यता घेणे, प्रवेश शुल्कासाठी शुल्क नियामक प्राधिकरण आणि विद्यार्थी प्रवेशाबाबत प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. एआयएसएचई पोर्टलवर नोंदणी करणे व आवश्यक माहिती वेळोवेळी सादर करणे बंधनकारक असल्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय पातळीवर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या संकेतस्थळावर या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५० जागा प्रवेशासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या प्रवेशाच्या पहिल्या यादीतील विद्यार्थी २४ ऑगस्टपासून शुल्क भरून आपले प्रवेश निश्चित करणार आहेत. तर २०२४-२५ चे शैक्षणिक वर्षाला पुढील एक ते दीड महिन्यामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे.