मुंबई :
निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले, त्यांची होणारी मानसिक पिळवणूक, मानसिक दडपणाखाली वावरणारे डॉक्टर यांना त्यांच्या समस्या व तक्रारी निनावी पद्धतीने मांडता याव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गुगल अर्जद्वारे किंवा मेलद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवासी डॉक्टरांकडून मांडण्यात आली. तसेच डॉक्टरांमधील परस्पर संवाद, त्यांची भाषा व वर्तन हे अनेकदा वादासाठी कारणीभूत ठरत असल्याचेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
काेलकाता येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत केईएम रुग्णालयाने नुकतेच ‘डॉक्टर आणि महिलांवरील हिंसाचार’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि महिलांवरील हिंसाचार याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थित निवासी डॉक्टरांनी त्यांना येत असलेल्या समस्या थेटपणे मांडल्या. या चर्चासत्रात प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि अधिवक्ता पर्सिस सिधवा, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक आदी वक्ते उपस्थित होते.
निवासी डॉक्टर हे मानसिक तणावाखाली वावरत असतात, त्यातच रुग्णालयात डॉक्टरांकडून वापरण्यात येणारी भाषा आणि त्यांचे वर्तन, परस्पर संवाद याबाबत निवासी डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. ग्रामीण व शहरी या वादामुळे डॉक्टरांमधील परस्पर संवादात अडथळे निर्माण होतात. तसेच ‘सर’ या शब्दाचा वापर करण्याला दिलेले अनावश्यक महत्त्व यामुळे रुग्णालयामध्ये अनेकदा वरिष्ठांकडून ‘रॅगिंग’ होण्याचे प्रकार घडत असल्याचे डॉक्टरांकडून यावेळी सांगण्यात आले. हा प्रकार कमी करण्यासाठी प्राध्यापकांचा हस्तक्षेप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्याना कधीही स्वत: ला इजा करण्याचा विचार केला आहे किंवा मानसिक आधार मागितला आहे का असा प्रश्न विचारला असता बहुतांश विद्यार्थ्यांनी हात वर केला. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी अधिक खुल्या चर्चेची गरज अधोरखित झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांमधील भावनिक आव्हाने लवकर ओळखण्यासाठी, त्यांचे निराकरण करण्यासाठी नियमित मानसिक आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. मात्र त्याचवेळी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीत रावत यांनी निवासी डॉक्टरांच्या समुपदेशानासाठी सुरू केलेल्या सेवेचा अनेकांनी लाभ घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.