मुंबई :
जी.टी. रुग्णालयाच्या परिसरात ५० जागांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील काही दिवसांत विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील. परंतु या रुग्णालयाच्या परिसरातील १४ मजली इमारतीत असलेली सरकारी कार्यालये अद्याप स्थलांतरित करण्यात आली नाहीत. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनासमाेर सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने बैठक घेत ही सर्व कार्यालये एअर इंडियाच्या इमारतीत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया पुढील १० दिवसांत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच ही इमारत रिकामी ही रुग्णसेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
जी.टी. रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही संलग्नता जाहीर केली. त्यानुसार या महाविद्यालयातील प्रवेशाला सुरूवात झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊन महाविद्यालयात हजर राहतील. महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र रुग्णालयाच्या १४ मजली इमारतीमध्ये सुरू असलेली शासकीय कार्यालये अद्याप रिक्त न झाल्याने पुढील सुविधा पुरवण्यात येणाऱ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच सामान्य प्रशासन विभागाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी जी.टी. रुग्णालयाच्या इमारतीमध्ये २५ हजार स्क्वेअर फूट इतकी जागा असून, एअर इंडियाच्या इमारतीमध्ये ५० हजार स्क्वेअर फूट इतकी जागा आहे. त्यामुळे या इमारतीमधील न्यायालयासह सर्व कार्यालये मंत्रालयासमोरील एअर इंडियाच्या इमारतीमध्ये हलविण्याच्या सूचना दिल्या. ही कार्यालये हलविण्याची प्रक्रिया पुढील १० दिवसांत सुरू होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.