मुंबई :
जर्मनीला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या करारानुसार जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना सरकारकडून मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबई व पुणे वगळता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तर पुण्यामध्ये १० आणि मुंबईमध्ये सर्वाधिक १५ केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण वर्गाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरूवात होणार आहे.
आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात राज्य सरकारने जर्मनीमधील बाडेन-वुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार चार लाख कुशल रोजगार पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून बाडेन-वुटेनबर्ग राज्याला १० हजार कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवा, आतिथ्यसेवा, सुरक्षा सेवा, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रॉनिक्स अशा ३० क्षेत्रातील मनुष्यबळ बाडेन-वुटेनबर्गला पुरविण्यात येणार आहे. मात्र हे कौशल्य असलेल्या उमेदवारांना जर्मन भाषेचा अडथळा येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील होतकरु तरुण-तरुणींना जर्मनीत नोकरीसाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जर्मन भाषा शिकविण्यासाठी पुण्यातील गोथे इन्स्टिट्यूट आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यात करार झाला. या करारांतर्गत उमेदवारांना जर्मन भाषेसह तेथील कार्यसंस्कृतीचे ज्ञान देण्यात येणार आहे.
जर्मन भाषेचे हे प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईमध्ये सर्वाधिक १५ तर पुण्यामध्ये १० प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण निशुल्क असणार आहे, तसेच तरुणांच्या सोयीनुसार त्याचे वर्ग हाेणार असून, एका वर्गात किमान ५० विद्यार्थी असणार आहेत. जर्मन भाषा प्रशिक्षणाचा कालावधी हा निवडलेल्या क्षेत्रानुसार सहा महिने ते १५ महिन्यांपर्यंत असणार आहे. याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राज्य सरकारमार्फत जर्मनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उमेदवारांना पारपत्र काढण्यासाठीही सहकार्य करणार असल्याची माहिती प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या प्राचार्य मनिषा पवार यांनी दिली.
कोण ठरणार पात्र
करारानुसार ठरलेल्या ३० क्षेत्रामधील अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाले असेल किंवा अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेली व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहे.
कोठे करता येईल नोंदणी
अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) https://www.maa.ac.in/GermanyEmployement या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. या उपक्रमाची अधिक माहिती प्राप्त करू शकतात. लिंकवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उमेदवारांचे कौशल्यवृद्धीही करणार
बाडेन-वुटेनबर्ग आणि महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी तसेच गरज पडल्यास क्षेत्रनिहाय कौशल्यवृद्धीसाठी युवकांना सरकारकडून मोफत कौशल्यवृद्धीचे अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून, त्याचा खर्च सरकार उचलणार आहे
शालेय शिक्षकांनाही प्रशिक्षण देणार
नोंदणी केलेल्या युवकांना जर्मन भाषा शिकविण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबई जिल्ह्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील असे नियमित शिक्षक ज्यांना जर्मन भाषा शिकविण्याची आवड आहे त्यांनी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 या लिंकवर नोंदणी करावी. त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य सरकार उचलेल, अशी माहिती मनिषा पवार यांनी दिली.