मुंबई :
दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असला तरी त्याला गोविंदा जखमी होण्याचे गालबोट लागले आहे. यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना २६४ गोविंदा जखमी झाले आहे. यात तीन बाल गोविंदाचा समावेश यातील ३६ गोविंदाना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, २२८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. या सर्व गोविंदांवर सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत
जी.टी. रुग्णालयात २४ गोविंदा जखमी अवस्थेत आले होते, त्यातील चौघांना रुग्णालयात दाखल केले असून, यामध्ये शिवा गुप्ता या ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर २० जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये आलेल्या आठ जखमी गोविंदांपैकी तिघांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यामध्ये दोन बाल गोविंदांचा समावेश आहे. मोहम्मद झमीर शेख (६) याच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले आहे. यश वाघेला (११) याच्या दंडाला फॅक्चर झाले आहे. अन्य पाच जणांना उपचार करून घरी सोडले आहे. जे.जे. रुग्णालयात पाच तर वरळीतील पोदार रुग्णालयात १८ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडले आहे.
केईएम रुग्णालयात ५१ जणांवर उपचार करण्यात आले असून, त्यातील ११ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील कुणाल पाटील (२०) याच्या पाठीच्या मणक्याला तर मनू खारवी (२५) याच्या डोक्याला मार लागला आहे. ४० जणांना उपचार करून घरी सोडले आहे. नायर रुग्णालयात १२ जणांना आणण्यात आले होते. त्यातील एकाला दाखल केले असून, ११ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. शीव रुग्णालयात २० जण जखमी गोविंदा आले असून, त्यातील त्यातील तीन जणांना दाखल केले, तर १७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. कूपर रुग्णालयात तिघांवर उपचार करण्यात आले.
सांताक्रूझ येथे दहीहंडी फोडताना उंचावरून पडून जखमी झालेल्या ३४ वर्षीय गोविंदाला बेशुद्धावस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या मणक्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
- राजावाडी रुग्णालय – १४ (१० दाखल, ४ जणांना उपचारानंतर घरी सोडले)
- वीर सावरकर रुग्णालय – ३ – (उपचारानंतर घरी सोडले)
- एमटी अगरवाल रुग्णालय – २ (१ दाखल, १ जणांना उपचारानंतर घरी सोडले)
- कुर्ला भाभा रुग्णालय – ५ (१ दाखल – ४ जणांना उपचारानंतर घरी सोडले)
- शताब्दी गोवंडी – १३ – (सर्वांना उपचारानंतर घरी सोडले)
- वांद्रे भाभा रुग्णालय – ९ (उपचारानंतर घरी सोडले)
- ट्रॉमा केअर रुग्णालय – २७ (३ दाखल, २४ जणांना उपचारानंतर घरी सोडले)
- व्ही.एन. देसाई रुग्णालय – २९ (सर्वांना उपचारानंतर घरी सोडले)
- एम. डब्ल्यू रुग्णालय – २ (उपचारानंतर घरी सोडले)
- बीडीबीए रुग्णालय – (३ दाखल, १६ जणांना उपचारानंतर घरी सोडले)