आरोग्य

‘रेबिजमुक्त मुंबई’साठी २८ सप्टेंबरपासून मुंबईत लसीकरण मोहीम

मुंबई :

श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’साठी पुढाकार घेण्यात आला आहे. या अंतर्गत २८ सप्टेंबर २०२४ पासून संपूर्ण मुंबई महानगरामध्ये व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे. तसेच रेबिजबाबत मुंबई महानगरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.

प्राणी कल्याण करणे व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (विशेष) किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लसीकरण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०३० पर्यंत भारत रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. त्या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने २०२२ मध्ये मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला. याच पार्श्वभूमीवर आता ‘वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज’ यांच्यासोबत मिळून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २८ सप्टेंबर २०२४ पासून भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानेही पुढाकार घेण्यात आला आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, शाळा, बांधकाम स्थळे, सार्वजनिक संस्था इत्यादींपर्यंत पोहोचून प्राणीविषयक कल्याणकारी कायदे आणि नियमांसंदर्भात जनजागृती वाढवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ६५ शाळांमधील सुमारे १३ हजार ३३२ विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये २७१ शिक्षक आणि ७९३ नागरिकांनीही सहभाग नोंदवला.

तक्रारी व विनंतीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

भटके किंवा पाळीव श्वानांचे लसीकरण, निर्बिजीकरण करणे तसेच यासंदर्भात तक्रारी किंवा विनंती नोंदवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मायबीएमसी (MyBMC) मोबाइल ॲपवर किंवा https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवरुन नागरिक विनंती किंवा तक्रार नोंदवू शकतात. भटक्या श्वानांची नसबंदी करण्याच्या उपक्रमाला गती देण्यासाठी आणखी काही प्राणी कल्याण संस्था नियुक्त करण्यात येतील, असेही प्रशासनाकडून कळवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *