शिक्षण

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई : 

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यानुसार राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर शिक्षकांची निवड केली आहे.

पुरस्कारासाठी प्रवर्गनिहाय प्राथमिक- ३८, माध्यमिक- ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)- १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)- २, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक- १, स्काऊट/गाईड (१+१)-२ अशा एकूण १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (१) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला सन (२०२२-२३) चा एक पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *