शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र (हिवाळी २०२४) मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. चारही विद्याशाखाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा यात समावेश आहे. हिवाळी सत्र २०२४ साठी आयोजित होणाऱ्या या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकॉऊन्टींग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र ५ च्या परीक्षा या २३ ऑक्टोबर २०२४ पासून आयोजित केल्या जाणार आहेत.

तृतीय वर्ष बीए सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार आहेत. एलएलबी ( ३ वर्षीय) सत्र ५ आणि एलएलबी ( ५ वर्षीय) सत्र ९ ची परीक्षा १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी ( संगणक शास्त्र), (जैवतंत्रज्ञान), (माहिती तंत्रज्ञान), (फॉरेन्सिक) आणि (डेटा सायन्स) सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून आयोजित केल्या जातील. यासह पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इंजिनीअरींग, आर्कीटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर आगाऊ वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे दाखल करावयाच्या अर्जाचा कालावधी आणि परीक्षा शुल्क विनाविलंब भरण्याचा कालावधीही सोबतच्या परिपत्रकानुसार निर्गमित केला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी दिलेल्या कालावधीतच परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *