मुंबई :
ईशान्य मुंबईत सर्व सुविधांनी सुसज्ज असे एकही रुग्णालय नाही. त्यामुळे मानखुर्द, शिवाजी नगर, गोवंडी ते मुलुंड मधील नागरिकांना राजावाडी किंवा सायन, केईएम रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. हा मुद्दा ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत ही मांडला होता. त्यानंतर पालिकेने याची दखल घेत राजावाडी रुग्णालयाचे पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सुमारे सातशे कोटी रुपयांची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे.
निवडणूकीच्या प्रमुख मुद्द्यापैकी ईशान्य मुंबईतील रुग्णालयांची दुरावस्थेबाबत खा. संजय दिना पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा घेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला होता. खासदार म्हणुन निवडुण आल्यानंतर संजय पाटील यांनी रुग्णालायबाबत संसदेत मुद्दा मांडला होता. ईशान्य मुंबईत मुलुंड, कांजुर मार्ग व शिवाजी नगर येथे डम्पिंग ग्राऊंड असल्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. ईशान्य मुंबईत चांगले रुग्णालय नसल्याने राजावाडी किंवा सायन रुग्णालयात उपचारासठी जावे लागते. या ठिकाणीही अनेक समस्या असल्याने नागरिकांची दमछाक होते. याबाबत खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी आल्याने त्यांनी हा विषय मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मांडून सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भुषण गगराणी यांची भेट घेऊन ईशान्य मुंबईतील रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत प्रश्न मांडले होते. याची दखल घेत आयुक्त गगराणी यांनी राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सातेश कोटी रुपयांची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली असून रुग्णालयातील खाटांची संख्या पाचशेवरुन बाराशेवर नेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे रुग्णालयाच्या क्षेत्रफळातही वाढ केली जाणार आहे.