शहर

एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत; ५९ आगारे पूर्णतः बंद

मुंबई :

प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील २५१ आगारापैकी ५९ आगारे आज पूर्णतः बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ऐन गणेशोत्सवाच्या तोडावर एसटी संघटनांनी संप केल्याने गावी जाणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होण्याची चिन्हे आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी संघटनांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

वेतनाशी निगडीत आर्थिक व महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात येत नसल्यामुळे एसटी कामगारांमध्ये गेले अनेक वर्षांपासून नाराजी आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम द्यावी, मागील करारातील त्रुटी दूर करावी अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारल्याने ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २५१ आगारांपैकी ५९ आगार पूर्णतः बंद आहेत. ७७ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ११५ आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरू होती. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन असेच सुरू राहिल्यास गणेशोत्सव काळात राज्यभरातील गणेश भक्तांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव ,पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. मंगळवारी २२,३८९ नियोजित एसटी फेऱ्यांपैकी ११,९४३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दिवसभरात सुमारे ५० टक्के वाहतूक बंद होती. या आंदोलनामुळे एसटीचा दिवसभरात अंदाजे १४-१५ कोटी रूपयांचा महसूल बुडाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार निर्णय

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला बुधवारी सायंकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी बोलावले आहे. यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

उदय सामंत यांच्यासोबतची बैठक निष्फळ

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलयाबाबत मंगळवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. ऐन गणेशोत्सवात आंदोलन करून कोकणवासीयांचा प्रवास गैरसोयीचा करू नये, यासाठी कृती समितीला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सामंत यांनी केले. तसेच कृती समितीच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असा पवित्रा संघटनांनी घेतला. त्यामुळे सामंत यांच्यासोबतची समितीची बैठक निष्फळ ठरली.

तर संपकऱ्यावर एफआयआर दाखल होणार

कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले गेले आहेत. तसेच या घटनेचे पुराव्यासाठी चित्रिकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *