मुंबई :
वैद्यकीय सेवेपासून वंचित असलेल्या भागातील नागरिकांपर्यत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पुढील दोन महिन्यांमध्ये राज्यामध्ये २५ हजार आरोग्य शिबिरे घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या शिबिराची सुरुवात १ सप्टेंबर रोजी घाटकोपर येथे करण्यात आली. पुढील काही दिवसांमध्ये जळगाव, चंद्रपूरसह राज्यातील इतर भागांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटाकातील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालय अंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबीरे भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या शिबिरांच्या आयाेजनाच्या मुख्य समन्वयकाची जबाबदारी रामेश्वर नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मादाय संस्था, वैद्यकीय संघटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित खासगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतीनिधी यांचा सहभाग असणार आहे.
ही आरोग्य शिबिरे प्रामुख्याने दलित वस्त्या, भटक्या जमातीच्या वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्ट्या या भागांत राबविण्यात येणार असून सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. यामध्ये नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांच्या ५९ प्रकारच्या विविध रक्त चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. ई.सी.जी तपासणी करणे, आयुष्मान भारत योजना कार्डचे वाटप करणे (आभा कार्ड), आवश्यक औषधांचे वाटप करणे, रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनाच्या माध्यमातून उपचारासाठी समन्वय साधणे आणि शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती त्याला देणे असे, आरोग्य शिबिराचे स्वरुप असेल, अशी माहिती राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.