मुंबई :
गणेशोत्सवादरम्यान गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. यावेळी गर्दीमध्ये मंडळांच्या ठिकाणी आणीबाणी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीमध्ये एखाद्या भाविकाला अचानक हृदयाशी संबंधित त्रास होऊन तो बेशुद्ध पडल्यास अशा व्यक्तीला वेळेत कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच हृदयाचे पुनरुज्जीवन (सीपीआर) केल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईतील नामांकित गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना एका खासगी रुग्णालयाकडून सीपीआरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याने चालता चालता नागरिकांना हृदयविकाराचे झटके येतात. गर्दीच्या ठिकाणी याची शक्यता अधिक असते. अशावेळी संबंधित व्यक्तीचे हृदय धडधडणे किंवा श्वास घेणे थांबते. अशा व्यक्तीला जीवन वाचविणारे तंत्र म्हणून ओळख असलेले सीपीआर दिल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या हृदयाची धडधड अचानक थांबते त्यावेळी त्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत त्याच्या शरीरात विशेषत: मेंदू आणि हृदयामध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा कृत्रिमरित्या पुरवठा करण्यासाठी छाती दाबणे आणि तोंडाद्वारे श्वासोच्छवास दिला जातो. श्वासामुळे फुफ्फुस आणि रक्तप्रवाहाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. मेंदू आणि हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांना डिफिब्रिलेशन, औषधे आणि व्हेंटिलेशन यासारखी वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत ते कार्यरत ठेवण्यासाठी सीपीआरची मोठी मदत होते. त्यामुळे मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयाने गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांसाठी सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गणेशोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सीपीआर तंत्राची मूलभूत तत्वे, छातीचा दाब, श्वासोच्छवास आणि स्वयंचलित डिफिब्रिलेटरचा वापर कसा करायचा याचा समावेश असणार आहे. यावेळी स्वयंसेवकांना प्रात्यक्षिके आणि परिस्थिती आधारित क्रिया दाखवण्यात येणार आहेत.
या मंडळातील स्वयंसेवकांना देणार प्रशिक्षण
लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली, तेजुकाया सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळ, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोर्टचा इच्छापूर्ती, रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ गणेशोत्सव मंडळ, चिंच बंदर-डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळातील स्वयंसेवकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.