शहर

Chief Minister Majhi Ladaki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात; मुख्यमंत्री १५ कुटुंबांना भेटणार

मुंबई : 

शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अभियानाची माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा ज्यांना लाभ झालाय त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, अशा कुटुंबांची देखील भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाचे ॲप लाँच होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तत्पूर्वी राज्यभरातील शिवसेना मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा टॉप १० योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यामुळे कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या अभियानामुळे त्याला लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

कुटुंब भेटीत काही मागायला नाही तर जनतेला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या धोरणांनुसार ही मोहीम राबवली जाणार आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीला ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदवाढ दिली आहे. या योजनेचे अनेकांनी चांगले अनुभव लाभार्थींनी सांगितले. बहिणींना खऱ्या अर्थाने मदतीचा हात देणारी ही योजना आहे. ते पुढे म्हणाले की आतापर्यंत सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेत अर्ज केले त्यापैकी १ कोटी ६९ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले.

ते पुढे म्हणाले की, आतापर्यंतच्या इतिहासात संपूर्ण कुंटुंबासाठी कल्याणकारी योजना आल्या नव्हत्या. अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वात मोठी शक्ती महिला आहे. घराचे बजेट चालवणारी महिला असून तिच्या हाती येणारे पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेत येणार आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर त्याचा देशाला फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र आज उद्योग, इन्फ्रा, कृषी, गुंतवणूक या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहोत. आपले सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर गेला होता, असे ते म्हणाले.

यापूर्वी शासन आपल्या दारी या योजनेत राज्यातील ५ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला. सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरुन पाच लाख रुपये इतकी वाढवण्यात आली. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वारकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. या अभियानात सर्वच कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये विशेष ॲपचा समावेश असेल. या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली. या शिकवणीनुसारच शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *