शिक्षण

सिनेट निवडणुकीपूर्वीच मनविसेत नाराजी; अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने संभ्रम वाढला

मुंबई : 

मुंबईसह उभ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीपूर्वीच विद्यापीठाचे राजकारण पेटले आहे. येत्या २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी प्रचाराची युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत असली तरी इतर विद्यार्थी संघटनांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकीत अधिकृत उमेदवार जाहीर केला नसला तरी मनसे सचिव सुधाकर तांबोळी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीपूर्वीच मनविसेमधील नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

जवळपास दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक येत्या २२ सप्टेंबर रोजी पार पडत आहेत. या निवडणुकीत १० जागांसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावित आहेत. या निवडणुकीसाठी एकूण १३ हजार ४०३ मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले १० उमेदवार जाहीर केले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे वर्चस्व पहायला मिळाले आहे. हे वर्चस्व मोडित काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, एनएसयुआय, छात्रभारती सारख्या अनेक विद्यार्थी संघटनांनी यापूर्वी निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली होती. मात्र या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वगळता एकाही विद्यार्थी संघटनांना पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर न केल्याने ठाकरे गट आणि अभाविप यांच्यात थेट लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील नाराजी आता पुन्हा एकदा उघड झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्व उमेदवार जाहीर करण्यात येतील, अशी घोषणा मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यामुळे मनविसेमध्ये नवचैतन्य पसरले होते. मात्र या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून एकही अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनविसेत प्रचंड नाराजी उफाळली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अधिकृत उमेदवार जाहीर केला नसला तरी माजी सिनेट सदस्य आणि मनसेचे सचिव सुधाकर तांबोळी यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या उमेदवारी अर्जामुळे मनविसेत प्रचंड खलबत्ते सुरु झाली असून निवडणुकीपूर्वी ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सुधाकर तांबोळी हे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. यापूर्वीच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत यश संपादन केले आहे. विद्यार्थी चळवळीतील त्यांचा अनुभव लक्षात घेता राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही त्यांनी सिनेटवर नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्या या अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे.

मतांची जुळवाजुळव होणार कशी

मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणुक ही पसंतीक्रमाच्या मतांनुसार होते. त्यामुळे पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांबरोबरच दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांसाठी जवळपास सर्वच उमेदवारांना जुळवाजुळव करावी लागणार आहे. सध्या झालेली नोंदणी लक्षात घेता युवा सेना वगळता इतर सर्वच उमेदवारांना दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांसाठी इतर राजकीय जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यातच प्रामुख्याने सुधाकर तांबोळी आणि छात्र भारतीचे रोहित ढाले यांच्या मतांवर अनेकांची मदार असणार आहे. त्यामुळे तांबोळी आणि ढाले यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाची मते आपल्याकडे वळविण्यासाठी येत्या काळात मुंबई विद्यापीठात नवी राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *