मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीबाबत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने पडदा टाकला. मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून २४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, तर या निवडणुकीचा निकाल २७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
मतदार नोंदणीमध्ये झालेल्या गोंधळाचा आरोप, काही राजकीय पक्षांना झुकते माप यामुळे स्थगित करण्यात आली होती. मात्र पुन्हा करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये झालेली घट, मतदार नोंदणीसाठी मतदारांकडून घेण्यात आलेल्या २० रुपयांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात विद्यार्थी संघटनेने घेतलेली धाव यामुळे मुंबई विद्यापीठाने २२ सप्टेंबर रोजी होणारी निवडणूक पुन्हा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अशा या वादग्रस्त ठरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीबाबत पुन्हा युवासेनेने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण १० जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. तर २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार असल्याचे परिपत्रक शनिवारी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांनी जारी केले. तसेच मतदान केंद्र आणि बूथमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.