क्रीडा

‘इंग्लिश खाडी’ पार करणारी जिया ठरली पहिली दिव्यांग जलतरणपटू

मुंबई :

अतिशय आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत तब्बल ३४ किमी अंतराची ‘इंग्लिश खाडी’ अवघ्या १७ तास २५ मिनिटात पोहण्याचा विक्रम जिया राय (वय १६) या दिव्यांग जलतरणपटूने नुकताच आपल्या नावे केला. या कामगिरीबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते कु. जिया राय हिचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्षगुच्छ देऊन २३ सप्टेंबर २०२४ रोजी महानगरपालिका आयुक्त दालनात सत्कार करण्यात आला. जियाची कामगिरी ही संपूर्ण मुंबईकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असे सांगून आगामी काळात आणखी नवनवीन विक्रम रचण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जियाला शुभेच्छा दिल्या.

पोहण्यासाठी अतिशय आव्हानात्मक अशा इंग्लिश खाडीमध्ये पाणी किती थंड होते ? असा प्रश्न आयुक्त गगराणी यांनी जियाला केला. तसेच जियाने जलतरणामध्ये आतापर्यंत केलेली कामगिरी ही संपूर्ण मुंबईसाठी एक गौरवपूर्ण बाब असल्याचेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या जलतरणाशी संबंधित सर्व पायाभूत सुविधा तसेच प्रशिक्षण देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका नेहमीच जियाला मदत करेल, असे सांगत गगराणी यांनी जिया आणि तिच्या पालकांचे मनोबल वाढवले. तसेच येत्या काळात होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत जियाला उत्तमोत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अमित सैनी आणि जियाचे आई वडील हे देखील उपस्थित होते.

जिया राय ही अवघ्या १६ वर्षांची जलतरूणपटू ही ‘ऑटिजम स्पेक्ट्रम’ विकाराने ग्रस्त आहे. एकल जलतरण (सोलो स्विमिंग) प्रकारात अतिशय वेगवान पद्धतीने आणि सर्वात तरूण दिव्यांग जलतरूणपटू (पॅरा स्विमर) म्हणून जागतिक पातळीचा विक्रम जियाने आपल्या नावे केला आहे. जियाने १८ डिग्री सेल्सिअस तापमानात २८ जुलै २०२४ रोजी ॲबोट्स क्लिफ (इंग्लंड) येथून पोहायला सुरूवात करत फ्रान्स येथे पोहचत ३४ किलोमीटरचे अंतर १७ तास २५ मिनिटांमध्ये पूर्ण केले. ऑटिजम स्पेक्ट्रम विकार असतानाही इंग्लिश खाडी (चॅनेल) पोहणारी जिया ही पहिली दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. जियाने तिचे हे यश ऑटिजम विकाराच्या जनजागृतीला समर्पित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *