Uncategorized

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

सुमारे ५५ टक्के मतदान : २७ सप्टेंबरला निकाल

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट वरील १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांसाठी आज ३८ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये सुमारे ५५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. या निवडणूकीचा निकाल २७ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार असल्याचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.

सिनेट निवडणुकीसाठी १३ हजार ४०६ पदवीधरांनी नोंदणी केली होती. आज सकाळी ९ वाजेपासून ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बुथवर मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी १० जागांसाठी एकूण २८ उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत आज बंद झाले.

मुंबई विद्यापीठाच्या दहा पदवीधर सिनेटची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपली. त्यामुळे ही मुदत संपण्याआधी निवडणूक घेऊन सिनेट स्थापन होणे गरजेचे होते. मात्र दोन वेळा सिनेट निवडणूक रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर आज निवडणूक पार पडली.

ठाकरे कुटुंबाचे मतदान

सिनेट निवडणुकीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी वांद्रे येथील चेतना कॉलेजमधील मतदान केंद्रावर आज मतदानाचा हक्क बजावला.

सिनेट निवडणुकीविरोधातील याचिका अखेर मागे घेतली

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीस स्थगिती मिळावी यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.त्यामुळे याचिका मागे घेण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. न्यायालयीन लढाई तात्पुरती थांबली असली तरी आमची संघर्षाची लढाई अद्याप संपलेली नाही. निवडणूक प्रक्रिया असंवैधानिक असल्याने, अशा प्रक्रियेतून निवडून आलेल्या उमेदवारांची वैधता सदैव संशयाच्या भोवऱ्यात असेल. आम्ही या असंवैधानिकते विरोधात सातत्याने आवाज उठवत राहू, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *